Lok Sabha Elections 2024: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 4 जागांवर लढणार, भाजप 31 तर शिवसेनेच्या वाट्याला 13 जागा
सध्याच्या चर्चेनुसार अजित पवार बारामती, रायगड, शिरूर आणि परभणीतून उमेदवार उभे करणार आहेत. दरम्यान, भाजप 31 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 13 जागांसाठी निवडणूक लढवणार आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections 2024) काही दिवसांचा कालावधी असताना महाराष्ट्रातील भाजप (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असलेल्या महायुती आघाडी (Mahayuti Alliance) मध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. वृत्तानुसार, एनडीएच्या भागीदारांनी अजित पवार यांच्या गटासाठी चार जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. सध्याच्या चर्चेनुसार अजित पवार बारामती, रायगड, शिरूर आणि परभणीतून उमेदवार उभे करणार आहेत. दरम्यान, भाजप 31 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 13 जागांसाठी निवडणूक लढवणार आहे.
तथापी, पवार कुटुंबीयांसाठी बारामतीला राजकीय महत्त्व आहे. अनेक दशकांपासून त्यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, अजित पवारांच्या अनपेक्षित बंडखोरीमुळे पक्ष आणि समर्थकांमध्ये फूट पडल्यानंतर या निवडणुकीत कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. रायगडसाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना अनंत गीते यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. गीते यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. (हेही वाचा -Vijay Shivtare On Ajit Pawar: अजित पवार 'नीच आणि उर्मट', एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याकडून जहरी टीका; बारामती अपक्ष लढणा)
शिरूर आणि परभणीमध्ये चुरशीची लढत -
शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीप कंद किंवा आधलराव पाटील या दोघांनाही उमेदवारी देऊ शकते, हे दोघेही पक्षाचे सदस्य नाहीत. शिवसेनेचे माजी खासदार पाटील यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती, तर श्री कंद हे पुण्यातील जिल्हा सहकारी बँकेचे प्रमुख म्हणून काम करतात. याशिवाय, परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली असून, ते विद्यमान खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या छावणीतील नेते संजय हरिभाऊ जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. विटेकर हे सध्या परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. (वाचा -Uddhav Thackeray On Nitin Gadkari: 'तुमचा अपमान होत असेल तर आमच्यात सामील व्हा'; उद्धव ठाकरे यांचे नितीन गडकरींना आवाहन)
दरम्यान, ताज्या वृत्तानुसार सध्या सुरू असलेल्या जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये भाजप राज्यातील 48 पैकी 31 जागा लढवणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 13 जागा लढवणार आहे. तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागा लढवणार आहे.