महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आली असताना राज्यातील सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांमध्ये रणनितीवर भर दिला जात आहे. खास करुन महायुतीमधील घटक पक्ष भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) परस्परांमध्येच जागावाटपावरुन संघर्ष करत आहेत. त्यातच भाजप (BJP) कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत आहे त्यामुळे निधर्मी समजणऱ्या एनसीपी (NCP) ची गोची झाली आहे. अशा स्थितीत हा पक्ष या कट्टरतावादाल मुस्लीम उमेदवार (Muslim Candidates) देऊन प्रतिडाव टाकणार असल्याची चर्चा आहे. या दोन पक्षांमध्ये शिंदे यांच्या सेनेचे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मौन
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, महायुतीच्या जागावाटपात वाट्याला येतील त्यापैकी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मुस्लीम उमेदवार (Muslim Candidates) उभा करणार आहे. अर्थात एनसीपीकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतेही विधान केले नसले तरी राजकीय वर्तुळ आणि प्रसारमाध्यमांतून अजितदादांच्या 'मुस्लिम कार्ड'ची जोरदार चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Ajit Pawar on Supriya Sule:'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक,' अजित पवार यांचं जन सन्मान यात्रेदरम्यान मोठं वक्तव्य)
मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये 5 मुस्लिम उमेदवार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत अद्याप तरी निकाल लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला असला तरी, शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, अजित पवारांच्या पक्षाकडून विधानसभेच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या मुंबईमध्ये पाच मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यातील 4 उमेदवार मुंबई तर 1 एमएमआर रिजनमध्ये असल्याचे समजते. याशिवाय राज्यभरातील प्रादेशिक विभागांनुसारही दादा गट प्रति विभाग 1 मुस्लिम उमेदवार देण्यावर विचार करत असल्याचे समजते. (हेही वाचा, Ajit Pawar on Mahayuti Seat Allocation Formula: अजित पवारांचे जागावाटपावर मोठे भाष्य; मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणारे संभाव्य मतदारसंघ
- वांद्रे विधानसभा मतदारसंघ
- मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
- अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ
- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
वरील मतदारसंघांसोबतच ठाणे जिल्ह्यातही कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाजीम मुल्ला यांच्या रुपात मुस्लिम उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवया मुंबईतून नवाब मलिक, त्यांच्या कन्या सना मलिक, झिशान सिद्दीकी असे अजित पवार यांचे संभाव्य उमेदवार असू शकतात.
पाठिमागील काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे कट्टर हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत वादग्रस्त विधाने करत आहेत. ही सर्व विधाने मुस्लिमद्वेशी आहेत. त्या विधनांचा फटका महायुतीत असल्याने आपल्या पक्षालाही बसेल असा इशारा पक्षाचे नेते अजितदादांना देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्षही आपण हिंदुत्त्ववादी असल्याचे सांगतो आहे. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्त्वापुढे शिंदे यांच्या सेनेच्या हिंदुत्त्वाचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.