अजित पवारांनी आमदारांच्या हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला - नवाब मलिक
अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतली.
आज सकाळी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. तर राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला या सत्तास्थापनेला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.
आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतली. (हेही वाचा - मुख्यमंत्री शपथविधी होता की दशक्रियाविधी? संजय राऊत यांचा उपरोधिक सवाल)
नवाब मलिक ट्विट -
अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना फसवून तिथे नेण्यात आल्याचे त्यांनी शरद पवारांना सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची भावना भाजपाविरोधी आहे. जे आमदरा गेले त्यांच्याविरोधात आणि जे आमदार जाणार असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल. सर्वसामान्य माणूस हे अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही. अजित पवारांसोबत जे 10 ते 12 जण गेले ते पुन्हा येणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.