Ajit Pawar vs Sharad Pawar: थांबायचे की निघायचे? अजित पवार यांनी बोलावली बैठक, आमदारांमध्ये संभ्रम; 'घरवापसी'ची जोरदार चर्चा
दस्तुरखुद्द सुनेत्रा पवार यांचाही मोठ्या मताधिक्क्याने बारामती येथून पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गळपाटल्याची भावना पक्षात निर्माण झाली असतानाच अजित पवार यांनी आमदारांची तातडीची बैठक मुंबई येथे बोलावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) केवळ भोपळा फोडण्याएवढेच यश मिळाले. दस्तुरखुद्द सुनेत्रा पवार यांचाही मोठ्या मताधिक्क्याने बारामती येथून पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गळपाटल्याची भावना पक्षात निर्माण झाली असतानाच अजित पवार यांनी आमदारांची तातडीची बैठक मुंबई येथे बोलावली आहे. सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) आयोजित केलेल्या या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बहुतेक आमदार या बैठकीकडे पाठ फिरवणार असल्याचे बोलले जात आहे.
फक्त एका जागेवर विजय
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगड येथून सुनिल तटकरे यांच्या रुपात केवळ एक जागा मिळाली आहे. हा अपवाद वगळता त्यांना भोपळाही फोडता आला नाही. इतकेच नव्हे तर अजित पवार ज्या महायुतीचा भाग होते त्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला राज्यातील जनतेने साफ नाकारले. त्या उलट जनतेने महाविकासआघाडीला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- 'कुठलंही अपयश अंतिम नसतं...')
'घरवापसी'चा विचार बळावण्याची चिन्हे
अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीस किती राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहतात याबाबत जोरदार उत्सुकता आहे. आजच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात आणि उपस्थित राहिलेल्या आमदारांपैकीही किती सोबत राहू शकतात याबातब प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजकीय वर्तुळातील चर्चा अशी की, अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार आता त्यांच्यासोबत राहायचे की नाही यावर विचार करत आहेत. काही आमदार भाजपमध्ये जाण्याचा तर काही पुन्हा घरवापसी करत शरद पवार यांच्याकडे जाण्याचा विचार करत असल्याचे समजते. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Nana Patole: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसला विधानसभेचे वेध! 150 जागा लढण्यासाठी चाचपणी, नाना पटोले यांचा दावाही चर्चेत; घ्या जाणून)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रतील महायुतीने बोलावलेल्या बैठकीस अजित पवार यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाणारी ठरली. दुसऱ्या बाजूला सात आणि आठ दारखेदरम्यन दिल्ली येथे होणाऱ्या एनडीएच्या बैठकीस अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात बोलले जात आहे की, अजित पवार यांच्या पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला एकूण दोन (कॅबीनेट आणि राज्य) मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याकडून हे पद कोणालामिळे याबाबत स्पष्टता नसली तरी अजित पवार यांच्या पक्षाकडून मात्र हे पद प्रफुल्ल पटेल यांना मिळण्याची शक्यता आहे. जे राज्यसभेचे खासदार आहेत.