Ajit Pawar: 'उंटावरुन शेळा हाकत विकास कामे होत नाहीत', सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांची फटकेबाजी

निमित्त होते शारदानगर येथे बांधलेल्या राज्यस्तरीय जलतरण तलावाच्या उद्घाटनाचे. काय घडले वाचा सविस्तर.

Ajit Pawar | (Photo Credit - Facebook)

अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे राज्याच्या राजकारणातील रोखठोक व्याक्तीमत्व. अनेकदा त्यांच्या भाषणातून ते दिसूनही येते. आताही बारामती (Baramati) येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बोलण्यातील रोखठोकपणा दिसून आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उद्देशून वडीलबंधूच्या नात्याने काहीशी 'दादा'गिरी केली. निमित्त होते शारदानगर येथे बांधलेल्या राज्यस्तरीय जलतरण तलावाच्या उद्घाटनाचे.

शारदानगर येथे बांधलेल्या राज्यस्तरीय जलतरण तलावाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अशाच पद्धतीचा तलाव इंदापूर येथे बांधण्यासाठी मी आणि भरणे यांनी ठरविले आहे. सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील हाच धागा पकडत अजित पवार यांनी फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले, शारदानगर येथे उभारलेला जलतरण तलाव हा केवळ पाच कोटी रुपयांमध्ये उभारला आहे. त्याचे बजेट होते सात कोटी रुपये. ही काटकसर केवळ संस्थेसाठी केली आहे. ती करताना गुणवत्तेत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. त्यामुळे अशा प्रकारची काटकसर इंदापूरला कोण करणार? त्याच्या कामाकडे कोण लक्ष ठेवणार? विकासकामे करायची तर त्यासाठी टीम असावी लागते. केवळ उंटावरुन शेळ्या हाकून विकासकामे होत नाहीत, असे स्पष्ट शब्दात अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, State Cooperative Bank Scam: आता अजित पवार ईडीच्या रडारावर? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीची शक्यता)

विशेष म्हणजे जलतरण तलावाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पवार कुटुंबीय आणि ऑलंपिक वीर वीरधवल खाडे, सुयश जाधव उपस्थित होते. या वेळी बोलताना उपस्थितांना उद्देशून अजित पवार म्हणाले, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी अनेक लोक अनेक संस्थांचे चेअरमन आहेत. त्यांनीही कामे करताना विचार करावा. आहे त्या बजेटपेक्षा कमी खर्चत कामे करावीत. ही काटकसर संस्थेसाठी करायची असते. त्यात गुणवत्तेशीही तडजोड करु नये. विकासकामांबाबत असलेली सर्व आव्हाने स्वीकारण्यास आपण तयार आहोत. त्यामुळेच तशी टीम तयार करुन आपण काम करत असतो. इतर ठिकाणीही बारामतीप्रमाणे सुविधा देऊ, असेही अजीत पवार यांनी या वेळी सांगितले.