महाराष्ट्र विधानसभा निवडणूक2019: नितेश राणे यांची शिवसेना विरूद्ध भूमिका नरमली; आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची व्यक्त केली इच्छा
नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत काम करायला आवडेल असे मत बीबीसी मराठी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
नारायण राणे कुटुंब आणि शिवसेना या पक्षामधील वैर सर्वश्रूत आहे. नारायण राणे शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि शिवसैनिकांमध्ये तणावाचे संबंध आहेत. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाच्या तिकीटावर कणकवलीमधून लढणार्या नितेश राणे यांनी आता शिवसेनेबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत काम करायला आवडेल असे मत बीबीसी मराठी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
नारायण राणे यांचा अद्याप भाजपामध्ये पक्षप्रवेश झालेला नाही मात्र लवकरच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन होणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना - भाजपा पक्षाची युती झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बीबीशी बोलताना, "जर आदित्य ठाकरे विधिमंडळाचं कामकाज समजून घेण्यासाठी, कायद्यांची निर्मिती कशी होते हे समजून घेण्यासाठी निवडणूक लढवत असतील तर त्याचं स्वागत व्हायला हवं." असेही ते म्हणाले.सोबत 'विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्यचीभेट व्हावी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा देखील नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नारायण राणे 15 ऑक्टोबरला करणार भाजप पक्षामध्ये प्रवेश; महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील होणार विलीन
महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांवर 21 ऑक्टोबर दिवशी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या निवडणूकीमध्ये ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. तर भाजपा-शिवसेना युती असली तरीही कणकवलीमधून भजपाने नितेश राणेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.