MAHA Cyclone: पालघर मध्ये 6-8 नोव्हेंबर दरम्यान शाळा, कॉलेज बंद; 'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचा निर्णय
पालघर शहराला 'महा' चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता; सुरक्षेचा उपाय म्हणून 6-8 नोव्हेंबर बंद राहणार जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेस
महाराष्ट्रासह अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर असणार्या अनेक राज्यांना पुढील चार दिवस सतर्क राहण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर मध्ये 6-8 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ठाणे, पालघर या शहरांना 'महा' चक्रीवादळाचा (MAHA Cyclone) मोठा तडाखा बसू असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर मच्छीमारांनीदेखील समुद्रात जाऊ नये, सागरी किनार्यापासून दूर रहावे, असे आवाहन पालघर जिल्हाधिकारीकार्यांकडून करण्यात आले आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या काळात गरज असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Maharashtra Weather Updates: 'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा मच्छिमार्यांना सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाची शक्यता.
अराबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'महा' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाचा महाराष्ट्राला 6-8 नोव्हेंबर दरम्यान धोका आहे. प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने आपत्कालीनयंत्रणा सज्ज आहे. चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका, महसूल, आरोग्य, वैद्यकीय पथक, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील पत्र्याची कच्ची घर, झोपड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पक्क्या घरामध्ये स्थलांतर करणे, शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली पिकं आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये यासाठी उपयोजना करण्याच्या करण्याच्या सूचना या बैठकीत संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.