Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या संजीव पुनाळेकर यांची जामीनावर सुटका

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोठडी सुनावलेल्या वकील संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Dr. Narendra Dabholkar (Photo Credits: Twitter)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोठडी सुनावलेल्या वकील संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30,000 रुपयांच्या जामीनावर पुनाळेकरांची सुटका करण्यात आली आहे. (अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी)

ANI ट्विट:

दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर यांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यासाठी त्यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. यापूर्वी ते 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर तपासात पुनाळेकरांच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती हाती लागल्याने त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित शरद कळसकर याने सचिन अंदुरे याच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे कबूल केले होते. तसंच डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांनीच दिल्याचेही त्याने सांगितले.