Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

या घटनेवरून राजकारणही तापले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी बदलापूर लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: राज्यात बदलापूरच्या आदर्श शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात गदारोळ वाढत चालला आहे. आता याबाबत महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना आणि सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत 24 ऑगस्ट रोजी विरोधकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या लैंगिक छळाच्या घटनेवरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाच्या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूरमध्ये जोरदार निदर्शने केली. यामुळे काल दिवसभर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

या संवेदनशील विषयावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारल्याची घोषणा केली. नाना पटोले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदलापूरमधील या लैंगिक शोषणाने समाज हादरला आहे. आज महाराष्ट्रात लहान मुलीही सुरक्षित नाहीत, ही अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना महाराष्ट्राचा अपमान आहे. ही शिक्षण संस्था भाजप आणि आरएसएसशी जोडलेली असल्याने सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे सुरुवातीला दिसते. बदलापूर प्रकरणातील शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाची त्वरीत चौकशी करून पीडितांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

या घटनेवरून राजकारणही तापले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी बदलापूर लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फडणवीस यांच्याकडे गृहखात्याचीही जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी वेळ नाही, असा दावा त्यांनी केला.

आदर्श शाळेतील घटनेनंतर शिक्षणमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली असती, तर आंदोलनाची गरजच पडली नसती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरून हे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येते. सरकार आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाचा वापर करून घरे आणि पक्ष पाडण्यात व्यस्त आहे, असे त्या म्हणाल्या. या घटनेवर खासदार सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत, आधी आणलेल्या शक्ती कायद्याचे काय झाले? असा सवाल केला. (हेही वाचा: Badlapur Sexual Assault Case: बदलापुरमध्ये आंदोलनातील 300 जणांवर गुन्हे, 28 जणांना पोलिसांकडून अटक; आज कोर्टात हजर करणार)

बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. हे प्रकरण एका राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या शाळेतील आहे. त्यासाठी त्याच राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची वकील म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, बदलापुरात मंगळवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आज तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात सुमारे 300 आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us