गणित यायला हवे अशी इच्छा असल्यास बदलाचे स्वागत करावे लागेल; अतुल कुलकर्णी ने 'बालभारती'च्या नव्या संख्यावाचन पद्धतीचं केलं समर्थन

फेसबूकच्या माध्यामातून एका शिक्षणतज्ञाचा लेख शेअर करत ‘जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल...’ असे अतुल कुलकर्णी म्हणाला आहे

Maths (Photo Credits: Facebook & Pixabay.com)

बालभारती इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्यावाचनाची पद्धत बदलल्याने पालक, शिक्षक यांच्यासह भाषाकारांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkerni) याने या नव्या संख्यावाचनाच्या पद्धतीला पाठिंबा दर्शवला आहे. फेसबूकच्या माध्यामातून एका शिक्षणतज्ञाचा लेख शेअर करत ‘जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल...’हा संदेश लिहीत त्याने नव्या बदलांचं स्वागत केलं आहे. जोडाक्षर नको म्हणून 'बालभारती' ने संख्या वाचनाची पद्धतच बदलली; भाषाकार, पालक, शिक्षक झाले अचंबित

आता एखादी संख्या पूर्वीप्रमाणे म्हणजेच 21 ही संख्या 'एकवीस' अशी न वाचता इंग्रजीप्रमाणे 'वीस एक' अशी वाचण्याची नवी पद्धत विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. हा प्रकार लहान मुलांना जोडाक्षर वाचताना त्रास होतो यामुळे सुचवण्यात आल्याची माहिती बालभारतीने दिली आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार, संख्यावाचनाच्या तीन पद्धती दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती त्यांनी आजमवावी. मात्र नवी पद्धत देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावी असे त्यांना आदेश देण्यात आले आहे.

संख्या वाचनाची ही नवी पद्धत म्हणजे मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची भावना अनेक भाषातज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा वाद सध्या गणिततज्ञ विरूद्ध भाषातज्ञ असा वाढत आहे. गणिततज्ञांच्या मते नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाबद्दलची भीती कमी होण्यसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.