'हर हर महादेव' चित्रपटाच्या प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी होणार कारवाई; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा इशारा
पुणे शहरात, मराठा संघटनेच्या सदस्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यत्यय आणला, तर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी रात्री मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली. या घटनेवर नाराजी व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, 'हर हर महादेव' हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना झालेली मारहाण सहन केली जाणार नाही. याबाबत ताकीद देताना अशा घटनांशी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘इतिहासाशी छेडछाड’ केल्याच्या आरोपावरून सोमवारी पुणे आणि ठाण्यात चित्रपटाचे प्रदर्शन विस्कळीत झाल्यानंतर फडणवीस यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
पुणे शहरात, मराठा संघटनेच्या सदस्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यत्यय आणला, तर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी रात्री मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. याबाबत लोकांचा निषेध लोकशाही मार्गाने मांडता आला असता, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, ‘सिनेमागृहात घुसून चित्रपट पाहणाऱ्यांना मारहाण करणे खपवून घेतले जाणार नाही. असा (कथित) कट रचणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’ ते पुढे म्हणाले, ‘लोकांना त्यांचा निषेध लोकशाही मार्गाने नोंदवण्याची मुभा आहे. मी चित्रपट पाहिलेला नाही आणि मला वादाची माहिती नाही.’
राष्ट्रवादीच्या अशा आक्रमक निषेधावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आपण आता सत्तेत नाही हे आव्हाड यांना कळत नसेल तर कायद्याने त्यांना याची जाणीव करून द्यावी.’ राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे, ज्यांनी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचे प्रदर्शन आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला. या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये आव्हाड यांचे समर्थक आणि काही प्रेक्षक यांच्यात वाद झाल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा, प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची)
दरम्यान, 'हर हर महादेव' चित्रपट हा शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर आधारित आहे. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचीही या चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. मात्र, चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. इतिहासाशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यात काही संघटनांचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी 'हर हर महादेव'वर टीका केली आणि चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली.