यवतमाळ: कळंब-जोडमोहा मार्गावर भीषण अपघातात 8 ठार, 15 जखमी; नातेवाईकाच्या अस्थिविसर्जन करून परतत असताना काळाचा घाला

आज, रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत.

यवतमाळ अपघात (Photo Credit : ANI)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील कळंब-जोडमोहा मार्गावर वाढोणा गावाजवळ एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. आज, रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत. नातेवाइकाच्या अस्थि विसर्जन करून परतत असताना काळाने हा घाला घातला. सध्या जखमींवर यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. वाहनात एकूण 18 स्त्री-पुरुष होते. अपघाताचे वृत्त काळातच गावकरी मदतीसाठी धावले. या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराव वानखडे यांचे दुःखद निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे नातेवाईक कोटेश्वर देवस्थान येथील नदीपात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. या कार्यक्रम आटोपून ते परतत असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी झाडाला आदळून दरीत कोसळली. या अपघातात 8 जण जागीच मृत्यू पावले. गाव अवघे 2 किलोमीटर असताना हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांची नावे-

अमर आत्राम-चालक, महादेव चंदनकर, किसन परसंकर, महादेव बावनकर, गणेश चिंचोळकर, अंजना वानखडे, सरस्वताबाई दाभेकर, अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. एका मृताचे नाव कळू शकले नाही.

या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय राठोड, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी केली. जखमींवर उपचार सुरु असून, मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.