मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार कुठे कमी पडलं, याची पोलखोल करण्यासाठी लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार- चंद्रकांत पाटील
आघाडी सरकारमुळे हे आरक्षण मातीमोल केलं आहे, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्यातील आघाडी सरकाराने काही ठोस भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षणाचा मुडदा पडला, अशी जहरी टिका करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडलं, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहिती दिली. आघाडी सरकारमुळे हे आरक्षण मातीमोल केलं आहे, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. आज या बैठकीची पहिली बैठक झाली.हेदेखील वाचा- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 5 जूनला बीडमध्ये सरकारविरोधात मोर्चा- विनायक मेटे
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आलं होतं. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली, अशी टीका पाटील यांनी केली.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या लढ्याला योग्य तो न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू योग्य तो निकाल समोर येत नसल्याने शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे (Vinayak Mete यांनी येत्या 5 जूनला बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. विनायक मेटे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.