Sameer Bhujbal Resigns: महायुतीला मोठा झटका! समीर भुजबळ यांचा राजीनामा; नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढणार अपक्ष निवडणूक
भुजबळ आगामी विधानसभा निवडणूक नांदगाव मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नांदगावची जागा सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या ताब्यात आहे.
Sameer Bhujbal Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी बंड पुकारलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Elections 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ आगामी विधानसभा निवडणूक नांदगाव मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नांदगावची जागा सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या ताब्यात आहे.
नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण याच ठिकाणाहून छगन भुजबळ यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ हे इच्छुक आहेत. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा -Maharashtra Sadan Scam: मंत्री Chhagan Bhujbal, Pankaj Bhujbal, Sameer Bhujbal यांना Special Court कडून महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लिन चीट)
बुधवारी, राष्ट्रवादी काँग्रेसने 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार सत्ताधारी महायुतीत सामील झाल्यावर त्यांच्या बाजूने राहिलेल्या मंत्र्यांसह 26 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबरोबरच, राष्ट्रवादीने अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सुलभा खोडके (अमरावती) आणि हिरामण खोसकर (इगतपुरी) या विद्यमान आमदारांनाही उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा - NCP Mumbai President: अजित पवार यांची रणनीती; समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती)
काँग्रेसचे दिवंगत दिवंगत माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांना नवापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून तर राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपसोबत असलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अर्जुनी-मोरगावमधून तिकीट देण्यात आले आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.