Pune: पुण्यात PMPML बसने धडक दिल्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
याप्रकरणी पोलिसांनी पीएमपीएमएलच्या अज्ञात चालकावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 279, 304 (अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 119/177 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Pune: पुणे शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुरुवारी शहरात मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या 76 वर्षीय व्यक्तीला पीएमपीएमएल बसने (PMPML Bus) धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. कोंढवा येथील साळुंखे विहार रोडवरील रिलायन्स फ्रेश मार्टजवळ गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन जसवंतराय दवे (76) असे मृताचे नाव असून ते रस्ता ओलांडत असताना पीएमपीएमएल बसने त्यांना धडक दिली. चालकाने बस थांबवली नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला. दवे यांचा मुलगा हेतव दवे (44) याने यासंदर्भात आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. (हेही वाचा -Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी
या अपघातात बिपीन दवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पीएमपीएमएलच्या अज्ञात चालकावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 279, 304 (अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 119/177 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी पुण्यात विविध घटनांमध्ये पीएमपीएमएलच्या धडकेत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्ता ओलांडताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक असून बस चालकांनी देखील गर्दीचे भान राखून बसचा वेग मर्यादीत ठेवणं गरजेचं आहे.