पुणे: 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेने दिला दोन नवजात मुलींना जन्म
सदर महिला पुण्यातील महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात दाखल आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर डॉक्टर्स,नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार केले जात आहेत. तसेच कोविड वॉरिअर्स सुद्धा सध्याच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तर दुसऱ्या बाजूला नॉन-कोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने त्यांच्यासाठी दवाखाने डॉक्टरांनी सुरु करावेत असे आवाहन केले आहे. याच दरम्यान आता पुण्यात (Pune) एका 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दोन नवजात मुलींना जन्म दिला आहे. सदर महिला पुण्यातील महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात दाखल आहे.
आतापर्यंत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे. तसेच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने त्यासंदर्भात संशोधन केले जात आहे. तर WHO यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी पुढचे वर्ष येईल असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. (महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 9,217 पोलिसांना कोरोना व्हायरसची बाधा; मागील 24 तासांत 121 नवे रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू)
पुणे शहरात काल नव्याने 1699 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 53,437 वर पोहचला आहे. तर 1315 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 18215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,67, 241 झाली असून काल 6241 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली