75th Independence Day: राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण फडकावणार तिरंगा

इतर जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. दरम्यान, या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

राष्ट्रध्वज (PC - pixabay)

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर आता कुठे मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. नुकतेच 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र महत्त्वाच्या खात्यांवरून भाजप आणि शिंदे कॅम्पमध्ये अजूनही मतभेद असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने आलेल्या 18 मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपाला विलंब होत असताना, आता मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी जिल्हानिहाय अशा मंत्र्यांची यादी जाहीर केली, ज्यांच्या हस्ते यंदाच्या स्वातंत्र्यदिनावेळी (Independence Day) ध्वजारोहण होणार आहे.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात 19 जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणावर ध्वजारोहण होणार आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी शिंदे-फडणवीस सरकारने अद्याप निश्चित केलेली नसल्याने ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये देवेंद्र फडणवीस नागपुरात, तर मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वजारोहण करतील. जिल्हानिहाय मंत्र्यांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), चंद्रकांत पाटील (पुणे), राधाकृष्ण विक्रोळी-पाटील (अहमदनगर), गिरीश महाजन (नाशिक), दादाजी भुसे (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव), रवींद्र चव्हाण (ठाणे), दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदीपन भुमरे (औरंगाबाद), सुरेश खडसे (सांगली), विजयकुमार गावित (नंदुरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना) आणि संजय राठोड (यवतमाळ) यांचा समवेश आहे. (हेही वाचा: Independence Day 2022 Rangoli Designs: १५ ऑगस्टच्या उत्सवासाठी खास रांगोळी डिझाईन (व्हिडिओ पाहा)

हे मंत्री 15 ऑगस्ट रोजी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करतील. इतर जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. दरम्यान, या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याची आठवण म्हणून केंद्र सरकारने 75 आठवड्यांपूर्वी 12 मार्च 2021 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती, जो 75 व्या स्वातंत्र्य दिनानंतर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. यंदाच्या स्वातंत्र्यदिनादिवशी प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.