ठाणे महानगरपालिकेचा अजब कारभार; जीवंत व्यक्तीला त्याचा मृत्यूचा दाखला घेण्यासाठी फोन
ठाण्यामध्ये एका 54 वर्षीय व्यक्तीने ठाणे महानगरपालिकेमध्ये त्याला स्वतःचेच मृत्यू प्रमाणपत्र स्वीकरण्यासाठी यावे याकरिता फोन आल्याचा दावा केला आहे.
ठाण्यामध्ये एका 54 वर्षीय व्यक्तीने ठाणे महानगरपालिकेमध्ये त्याला स्वतःचेच मृत्यू प्रमाणपत्र स्वीकरण्यासाठी यावे याकरिता फोन आल्याचा दावा केला आहे. चंद्रशेखर देसाई असे त्या व्यक्तीचं नाव असून मानपाडा भागात ते राहतात. इंडियन एक्सप्रेस च्या वृत्तानुसार, चंद्रशेखर यांना ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर घरीच उपचार घेतल्यानंतर त्यांनी आजारावर मात देखील केली. घरातच क्वारंटाईन असताना एकदा पालिकेकडून त्यांना प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला होता.
दरम्यान चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने त्यांना फोन करून ती ठाण्याच्या आरोग्य विभागातून बोलत असल्याचं म्हणाली. यावेळी तिने चंद्रशेखर देसाई यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती देण्यासाठी फोन करत असल्याचं सांगितलं. योगायोगाने हा फोन खुद्द चंद्रशेखर यांनीच उचलला होता. त्यांनी आपण स्वतःच बोलत असल्याची माहिती दिल्यानंतर समोरची व्यक्ती देखील गडबडली आणि तिने फोन ठेवला. यानंतर चंद्रशेखर स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये पोहचले आणि त्यांनी घडल्या प्रकाराचा जाब विचारला पण तेथे अपेक्षित उत्तर मिळाले नाही. माहिती आयसीएमआर कडून मिळत असल्याचं उडवा उडवीचं उत्तर त्यांनी दिलं. (नक्की वाचा: ठाणे पलिका रूग्णालयामध्ये गायकवाड-सोनावणे कोरोना रूग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल; एका कुटुंबाला दोनदा करावे लागले अंत्यविधी; प्रशासनाचे चौकशी करून कारवाईचे आदेश)
ANI Tweet
एएनआय सोबत बोलताना ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही माहिती पुणे कार्यालयातून मिळते.आम्ही बनवत नाही. त्यांचं नाव मृत्यूमुखी पडलेल्यांच्या यादीमध्ये येणं ही काही तांत्रिक चूक असू शकते. आता आम्ही टीमला यादी पडताळून पहाण्याचे आदेश दिले आहेत. असे सांगितले आहे.