Uddhav Thackeray vs Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

त्यांच्या परतण्याबाबत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही ठाकरे गटाच्या नेत्यानी म्हटलं आहे. तथापी, यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील सुमारे 10-15 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता.

Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: महाराष्ट्राचं सत्ता समीकरण आता पुन्हा एकदा नवं वळण घेण्याची शक्यता आहे. कारण, आता शिंदे गटातील (Sinde Group) 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) एका वरिष्ठ नेत्याने शुक्रवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिली. या आमदारांनी पक्षात परतण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या परतण्याबाबत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही ठाकरे गटाच्या नेत्यानी म्हटलं आहे. तथापी, यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील सुमारे 10-15 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेची केवळ एक जागा जिंकण्यात यश मिळाल्यानंतर हा दावा करण्यात आला. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता अनेक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. आम्ही 9 जून रोजी आमच्या बैठकीत या प्रस्तावांवर विचार करू. 10 जून रोजी आमचा स्थापना दिवस आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार'; निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंत झाले आक्रमक)

दरम्यान, अवघ्या 17 जागा जिंकणाऱ्या सत्ताधारी महायुती आघाडीसाठी महाराष्ट्र लोकसभेचे निकाल आपत्तीजनक ठरले. तसेच दुसरीकडे, दोन पक्षांमध्ये फूट पडलेल्या विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हीए) 30 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 13 जागा जिंकल्या, शिवसेनेला (यूबीटी) नऊ आणि राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार) आठ जागा मिळाल्या. (हेही वाचा - Aaditya Thackeray On NDA Sarkar: 'सरकार बनताच आश्वासनं आणि पक्ष मोडण्याची भाजपाची जूनी सवय' म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिला भाजपाच्या मित्रपक्षांना 'हे' पद मिळवण्याचा सल्ला!)

लोकसभा निवडणुकीतील भाजप पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेत बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावरच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी अमित शहा यांच्याशी चर्चा करत आहेत. यानंतर ते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करणार आहेत.