Mumbai Doctor's Sexual Assault On COVID-19 Patient: 44 वर्षीय कोरोना व्हायरस पुरुष रुग्णावर डॉक्टरचा लैंगिक अत्याचार; कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल

एकीकडे या आजारातून लवकर बरे होऊ की नाही ही भीती रुग्णांना सतावत आहे,

Say No to Sexual Assault. (Photo Credits: File Image)

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत आहे, अशात अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार चालू आहेत. एकीकडे या आजारातून लवकर बरे होऊ की नाही ही भीती रुग्णांना सतावत आहे, तर दुसरीकडे रुग्णांना स्वतःच्या शारीरिक सुरक्षेची चिंतादेखील  भेडसावत आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरवर लैंगिक अत्याचाराचा (Sexual Assault) आरोप करण्यात आला आहे. ही घटना 1 मे रोजी मुंबईतील वॉकहार्ट हॉस्पिटल (Wockhardt Hospital) मध्ये घडली. रुग्णालयातील 34 वर्षीय डॉक्टरने 44 वर्षीय पुरुष पेशंटवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे त्याला अद्याप अटक झालेली नाही. हा डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो असा पोलिसांचा संशय आहे, त्यामुळे सध्या तरी या डॉक्टरला घरीच वेगळे राहण्यास सांगितले आहे. मुख्य म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या एक दिवस आधीच हा डॉक्टर या रुग्णालयात कामास लागला होता. आता प्रशासनाने या डॉक्टरला कामावरून काढून टाकले आहे. सोमवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या डॉक्टरने नवी मुंबईतील महाविद्यालयातून एमडी पूर्ण केली आहे. त्यानंतर 28-29 एप्रिल रोजी रुग्णालयात त्याची मुलाखत घेण्यात आली. (हेही वाचा: COVID19 रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे शहरातील ग्लोबल इम्पॅक्ट हबचे 1000 बेडच्या रुग्णालयात रूपांतर करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश)

डॉक्टरविरोधात कलम 377, 269 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे सांगितले गेले आहे की, या डॉक्टरने रुग्णालयाच्या दहाव्या मजल्यावरील आयसीयूमध्ये गेल्यावर रुग्णाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. रुग्णाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरने ऐकले नाही. अखेर रुग्णाने अलार्म वाजवला व त्यानंतर ताबडतोब हॉस्पिटलचे कर्मचारी तिथे दाखल झाले व त्यांनी रुग्णाची सुटका केली. याबाबत अग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.