Pune Shocker: घराशेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या घराशेजारी राहतो.
Pune Shocker: पुणे शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची भीषण घटना घडली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी येथे 1 ते 4 जून दरम्यान नराधमाने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी गोमाजी रामजा गायकवाड (वय 35) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या घराशेजारी राहतो. ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे ते वारंवार एकमेकांच्या घरी जात होते. दरम्यान, 1 जून ते 4 जून दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या नऊ वर्षीय मुलीला राहत्या घरी बोलावून तिचा लैंगिक छळ केला. (हेही वाचा - Pune: सासरवाडी गेलेल्या 26 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल)
याशिवाय आरोपीने याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पीडितेने आईला सांगितल्यावर आईने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
दरम्यान, पुण्यातील दुसऱ्या एका घटनेत निगडी येथे एका नराधमाने मतिमंद महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करून मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान निगडी आणि येवलेवाडी येथे तिच्यावर बलात्कार केला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माणिक नानाभाऊ ढोरे (वय 35) व अन्य एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची मुलगी मानसिक आजारी असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्या जवळ जाऊन तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.