Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात (Maharashtra) आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात (Buldhana) एक तर, पुणे (Pune) येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 47 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली. जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 9 लाख 35 हजार 584 वर पोहचली आहे. यांपैकी 47 हजार 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 94 हजार 260 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 834 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 144 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 338 वर पोहचली आहे. यात 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: बारामती येथे लॉकडाउनच्या काळात नियम मोडणाऱ्या तीन जणांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
एएनआयचे ट्वीट-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील आतापर्यंत एकूण 191 परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे.