Shocking! 25 वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर 9 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर मुलीची आत्महत्या

आरोपीने पुढील काही महिन्यांत अनेकवेळा या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी मृत्यूच्या वेळी सहा महिन्यांची गर्भवती होती.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नुकतेच संपूर्ण देशात बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण ‘रक्षाबंधन’ साजरा झाला. या दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) येथे एका भावाने आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची भीषण घटना समोर आली आहे. चुलत भावाकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचारामुळे ही 17 वर्षीय मुलगी गरोदर राहिली व याच धक्क्याने तिने आत्महत्या केली. वीरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आई-वडिलांनी याबाबत बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.

एका शेतकऱ्याची मुलगी असलेल्या पीडितेने बुधवारी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जिथे तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तिच्या मृत्यूनंतर वीरगाव पोलिसांनी तिच्या पालकांकडे चौकशी केली असता ही संतापजनक गोष्ट समोर आली. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी आपल्या मुलीमध्ये काही बदल झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत विचारले असता, मुलीने आपण गर्भवती असल्याची माहिती दिली.

पीडितेने आईला पुढे सांगितले की, त्याच परिसरात राहणारा तिचा 25 वर्षीय चुलत भाऊ, तिच्यावर बळजबरी करतो, ज्यामुळे ती गरोदर राहिली. पीडितेने तिच्या आईला दिलेल्या कबुलीनुसार, नऊ महिन्यांपूर्वी चुलत भावाने पीडितेवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला होता. पीडिता त्यावेळी घरी एकटीच होती आणि आरोपी तिला भेटायला आला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला.

त्यावेळी घाबरलेली पीडित मुलगी शांत राहिली आणि याच गोष्टीने त्याला पुढे अनेकदा अत्याचार करण्यास प्रोत्साहन मिळाले. आरोपीने पुढील काही महिन्यांत अनेकवेळा या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी मृत्यूच्या वेळी सहा महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी याबाबत ताबडतोब एफआयआर नोंदवला आणि आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा: Rape: चंद्रपूरात एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक)

गुन्ह्याबद्दल अधिक तपशील मिळविण्यासाठी पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या घटनेला दुजोरा दिला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपीवर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांसह भारतीय दंड संहिता अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप ठेवण्यात आला आहे.