Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 2250 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 39,297 वर
राज्यात आज 2250 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व अशाप्रकारे एकूण संख्या आता 39,297 अशी झाली आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रामधील (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत स्थिरता दिसून येत आहे. राज्यात आज 2250 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व अशाप्रकारे एकूण संख्या आता 39,297 अशी झाली आहे. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे आज नवीन 679 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 10,318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 27,581 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत माहिती दिली.
एएनआय ट्वीट -
राज्यात 65 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून, एकूण संख्या 1390 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 41, पुण्यात 13, नवी मुंबईमध्ये 3, पिंपरी- चिंचवड 2, सोलापूरात 2, उल्हासनगरमध्ये 2, तर औरंगाबाद शहरात 2 मृत्यू झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 07 हजार 72 नमुन्यांपैकी, 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर 39 हजार 297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 04 हजार 692 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 26 हजार 752 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर. 19 महिला आहेत. आज झालेल्या 65 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 32 रुग्ण आहेत, तर 31 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 2 जण 40 वर्षांखालील आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संदर्भातील 1 लाख 11 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 12 हजार 359 पास वितरित. पोलिसांवर हल्ल्याच्या 244 घटना घडल्या असून, 823 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आहे. पॉझिटिव्ह आढळलेले 142 पोलीस अधिकारी, 1246 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.