Mumbai Fake Vaccination Scam: मुंबईतील 'या' 6 केंद्रात सुरु होते बोगस लसीकरण, 8 जणांना अटक
कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलासह बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, खार, लोअर परळ अशा विविध ठिकाणी एकसारख्याच पद्धतीने बोगस लसीकरणाची शिबिरे आयोजित करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Fake Vaccination Scam: कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलासह बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, खार, लोअर परळ अशा विविध ठिकाणी एकसारख्याच पद्धतीने बोगस लसीकरणाची शिबिरे आयोजित करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याजवळील काही रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीने नागरिकांची फसवणूक करून ही रक्कम मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याचबरोबर आरोपींनी नागरिकांना नेमकी कोणती लस दिली? तसेच या लसीचे काही विपरीत परिणाम तर घडणार नाहीत ना? असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे.
कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. याठिकाणी आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस 1 हजार 60 रुपये आकारले जात होते. याचबरोबर बोरिवलीमधील आदित्य कॉलेज, मानसी शेअर्स अँड स्टॉक बोरिवली पश्चिम, पोदार एज्युकेशन सेंटर परळ, टिप्स कंपनी अंधेरी, टिप्स कंपनी खार, बँक ऑफ बडोदा लिंक रोड ब्रँच मालाड अशा एकूण सहा ठिकाणी बोगस लसीकरण शिबिरे आयोजित करत नागरिकांचे लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- Delta Plus COVID19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अनलॉकच्या नियमांमध्ये बदल; सारे जिल्हे लेव्हल 3 वर राहतील
या बोगस लसीकरणाबाबत मुंबई महापालिकेने प्रतिक्रिया दिली आहे. "मुंबई बोगस लसीकरण करणारी टोळी एकच असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यानुसार पालिकेनेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या लोकांना कोरोनाची लस पुरवल्याचे एकाही रुग्णालयाने म्हटलेले नाही. तसेच लस देण्यात आलेल्या व्यक्तींना टोळीकडून लशीविषयी बनावट प्रमाणपत्र देण्यात आले आहेत", अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दिली आहे.