Uday Samant: महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात; उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
बच्चू कडू यांच्या संपर्कात महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट यावेळी उदय सामंत यांनी केला.
Uday Samant: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नव-नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीतील (MVA) 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात सामंत बोलत होते.
राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार आहे, असा विश्वासही यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या संपर्कात महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट यावेळी उदय सामंत यांनी केला. (हेही वाचा -Bjp On Lok Sabha Vidhan Sabha Election 2024: 'बोलताना तोंडावर ताबा ठेवा', भाजपकडून मंत्र्यांना सक्त ताकीद; राजकीय भूमिका मांडण्याची केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच मुभा)
दरम्यान, टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल होत. यावेळी उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेला पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती.
टेंभूर्णीत आयोजीत कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांची उपस्थिती होती. परंतु, यावेळी उदय सामंत यांचे भाषण सुरू होताच वीज तोडणीवर बोला असा गोंधळ प्रेक्षकांनी सुरू केला. यावर उदय सामंत यांनी पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात येईल, असं आश्वासन दिलं.