नाशिक: लष्कराच्या 63 पदांसाठी तब्बल 20 हजार तरुण देवळालीमध्ये दाखल
देवळाली येथे 116 इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती सुरु आहे. लष्कराच्या 63 जागांसाठी तब्बल 20 हजार तरुण दाखल झाले आहेत.
नाशिक (Nashik) येथील देवळाली (Deolali) कॅन्टोमेंटमध्ये लष्कराच्या भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे तुफान गर्दी झाली आहे. देवळाली येथे 116 इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती (Infra Para Battalion Recruitment 2019) सुरु आहे. लष्कराच्या 63 जागांसाठी तब्बल 20 हजार तरुण दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेला तसेच बसथांब्यावर काढली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्जही केली. या गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या गर्दीवरून देशातील बेरोजगारीचे चित्र स्पष्ट होते. (हेही वाचा - सत्तास्थापनेचा मुहूर्त हुकला, आता 'या' दिवशी असेल अमित शाह यांचा मुंबई दौरा?)
देवळाली येथे बुधवारी 30 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाकडून 3 अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवळालीतील आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा - कोल्हापूर: खुर्च्या बांधून ठेवल्या! गोकुळ दूध उत्पादक संघ सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यात
अवघ्या 63 जागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या गर्दी झाल्यामुळे प्रशासनाला रात्री दीड ते दोनच्या सुमारास भरती प्रक्रिया सुरु करावी लागली. ऐन सणासुदीच्या दिवसांत भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याठिकाणी लष्कराचे जवान, स्थानिक पोलिस, होमगार्ड तैनात करण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला.