राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे 162 आमदार पहिल्यांदाच एकत्र; संध्याकाळी 7 वा बैठकीचे आयोजन

आज संध्याकाळी सात वाजता हॉटेल हयातमध्ये तीनही पक्षांचे 162 आमदार उपस्थित राहणार आहेत

Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला. त्यानंतर राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस पक्षांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी चालू असताना, अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असे वृत्त आले. अजित पवार यांनी बंड केले व राष्ट्रवादीचे आमदार फोडले असा आरोप होऊ लागला. अशात आता महाविकासआघाडीने पुन्हा जुळवाजुळव करून सत्तास्थापनेच्या शर्यतीत आपले स्थान बळकट केले असल्याचे दिसत आहे. आज संध्याकाळी सात वाजता हॉटेल हयातमध्ये तीनही पक्षांचे 162 आमदार उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

संजय राऊत ट्वीट -

आपल्या ट्वीट मध्ये संजयजी म्हणतात, 'आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि सायंकाळी 7 वाजता ग्रँड हयात येथे प्रथमच आमचे 162 आमदार एकत्र उपस्थित राहणार आहेत. या आणि स्वतः खात्री करा.' भाजपा सरकारकडे जर बहुमत आहे, तर सिद्ध करायला इतका वेळ? आणि त्यासाठी हे फोडाफोडीचे राजकरण का करावे लागतेय? असा सवाल आजच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर आता प्रथमच राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेचे आमदार एकत्र येणार आहे. (हेही वाचा: भाजप कडे जर का बहुमत असेल तर कमळ ऑपरेशनची गरज काय; संजय राऊत यांचा सवाल)

दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र या चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही. अशात हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. भाजपने तोडफोडीचे राजकारण केले असा आरोप पक्षावर ठेवण्यात आला आहे. त्याआधी महाविकासआघाडीने आपल्या 162 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्त केले आहे. अशाप्रकारे  महाविकासआघाडीने 145 चा आकडा पार केला आहे. आता राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार नक्की कोणाच्या गोटात असतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.