2-3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर 11 तासांचा मेगाब्लॉक; लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द
लोअर परळ स्टेशनजवळील उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने 2-3 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) या दोन दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
लोअर परळ (Lower Parel) स्टेशनजवळील उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने 2-3 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) या दोन दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे लोअर परेल ते चर्चगेट दरम्यानच्या 200 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेगाब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊनच विकेंडला बाहेर पडणे सोयीस्कर ठरेल. (लोअर परेल स्थानकावर पुढील 12 महिन्यात नवा पूल उभा राहणार)
लोअर परळ स्थानकाजवळ उड्डाणपुलाचे गर्डर नवे टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसंच इतर कामांसाठी 2-3 फेब्रुवारीला रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान लोअर परळ ते चर्चगेट दरम्यान एकही लोकल चालवण्यात येणार नाही. विरार, वसई, भाईंदर, बोरीवली येथून सुटणाऱ्या गाड्या प्रभादेवी स्थानकापर्यंत येतील. त्यापुढे मात्र लोकल सेवा उपलब्ध होणार नाही. लोकल फेऱ्यांसह मेल, एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत.
20 ऑगस्ट 2018 पासून या पुलाचे काम सुरु असून 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरू राहील. मात्र या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होण्यास नक्कीच मदत होईल.