Tejas Thackeray Discovers New Snakehead Species: तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, मेघालय East Khasi Hills येथे शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकडेड
या माशाचे वर्णन करणारे काही पेपर्स तयार करुन तेजस यांनी ते 'कोपिया - अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल' मध्ये प्रकाशित झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आणखी एक नवे संशोधन केले आहे. तेजस ठाकरे यांनी मेघालयातील पूर्व खासी टेकड्यांतून (East Khasi Hills of Meghalaya, India) एका दुर्मिळ आणि नव्या माशाची प्रजात शोधली आहे. चन्ना स्नेकडेड (Snakehead Species) मासा असे नव्याने सापडलेल्या प्रजातीला त्यांनी नाव दिले आहे. तेजस ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, तेजस यांनी या आधी आणखी एक मासा शोधला होता. त्या माशाचे नाव त्यांनी 'हिरण्यकेशी' (Hiranyakeshi) असे ठेवले होते.
तेजस ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, चन्ना स्नेकडेड हा मासा मेघालातील टेकड्यांमध्ये असलेल्या गोड्या पाण्यात आढळतो. या माशाचे वर्णन करणारे काही पेपर्स तयार करुन तेजस यांनी ते 'कोपिया - अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल' (Copeia - the official journal of the American society of ichthyologists & herpetologists) मध्ये प्रकाशित झाले आहेत. (हेही वाचा, Tejas Thackeray Discovered a New Fish Hiranyakeshi: तेजस ठाकरे यांनी शोधला नवा मासा, नाव ठेवलं 'हिरण्यकेशी)
तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे की, चन्ना स्नेकडेड प्रजातीला त्यांनी Mr. Aristone M Ryndongsngi यांच्या स्मरणार्थ नाव देणार असल्याचे म्हटले आहे. अॅरिस्टोन एम रेंडॉन्ग्संगी यांनी प्रथम ही प्रजाती शोधली होती. त्याबाबत त्यांनी काही काम केले आणि भ्रमंती करुन त्याबाबत काही तपशीलही गोळा केला. ज्याचा पुढील संशोधनासाठी मोठा फायदा झाला.
दरम्यान, वन्यजीवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्याची तेजस ठाकरे यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तेजस ठाकरे यांनी 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. यात खेकडा, पाली आणि इतर काही वन्यजीवांचा समावेश आहे. तेजस ठाकरे यांनी केलेले खेकड्यांविषयीचे संशोधन न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाले आहे. तेजस यांचं खेकड्यांविषयी दुसरेही एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. यात पश्चिम घाटातील एका खेकड्याचे नाव 'सह्याद्री' या मराठी नावावरुन सह्याद्रियाना' असे ठेवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आणखी एक मासा शोधला होता. त्या माशाचे नाव त्यांनी 'हिरण्यकेशी' (Hiranyakeshi) असे ठेवले होते.