Palace on Wheels: दोन वर्षांनी पुन्हा सुरू होणार लक्झरी ट्रेन 'पॅलेस ऑन व्हील्स'; मिळणार 5 स्टार रूम, जिम-स्पा सारख्या सुविधा, जाणून घ्या भाडे

साध्यासह डिलक्स रुम्सही ट्रेनमध्ये आहेत. इंटरनेट, टीव्ही अशा इतर सुविधा आहेत.

Palace on Wheels (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोनामुळे 18 मार्च 2020 पासून बंद असलेली रॉयल रेल ‘पॅलेस ऑन व्हील्स’ (Palace on Wheels) पुन्हा एकदा रुळांवर धावणार आहे. राजस्थान पर्यटन विकास महामंडळ (RTDC) सप्टेंबरच्या अखेरीस ही रॉयल ट्रेन सुरू करणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली आहे. ट्रेनच्या पहिल्याच प्रवासासाठी 200 हून अधिक लोकांनी आरटीडीसीद्वारे बुकिंग केले आहे. त्यामुळे ट्रेनच्या सर्व जागा भरल्या आहेत. आता ट्रेनच्या पुढील प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग केले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वर्षांपासून बंद असलेली रॉयल ट्रेन चालवण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता रेल्वेच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे व ते 20 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करता येईल. अशा स्थितीत ही ट्रेन पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन आपल्या 7 दिवस आणि 8 रात्रीच्या प्रवासात एकूण 3 हजार किलोमीटरचा प्रवास करेल. यादरम्यान प्रवाशांना राजस्थानच्या विविध पर्यटनस्थळी नेण्यात येणार आहे.

असा असेल प्रवास-

पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन दर बुधवारी चालवली जाईल. ही ट्रेन दिल्ली ते जयपूरसाठी सकाळी 6.30 च्या सुमारास धावेल. येथे ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे रेड कार्पेटवर शाही शैलीत स्वागत केले जाईल. ही ट्रेन जयपूरला उशिरा दुपारी 2 वाजता पोहोचेल. येथे सकाळी सात वाजता ट्रेनमध्येच प्रवाशांना नाश्ताही दिला जाणार आहे. सकाळी 8.15 च्या सुमारास प्रवासी जयपूर टूरसाठी निघतील.

ट्रेन रात्री 8 वाजता जयपूरहून निघेल आणि पहाटे 4:45 वाजता सवाई माधोपूर स्थानकावर पोहोचेल. येथून सकाळी 10.20 वाजता निघून ती चित्तौडगडला दुपारी 4 वाजता पोहोचेल आणि नंतर रात्री 2 वाजता उदयपूरला रवाना होईल. सकाळी आठच्या सुमारास ही ट्रेन उदयपूर स्थानकात पोहोचेल. येथून दुपारी 4 वाजता सुटून ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता जैसलमेरला पोहोचेल.

ही गाडी जैसलमेरहून रात्री 11.55 वाजता सुटून जोधपूरला सकाळी 7 वाजता पोहोचेल. येथून संध्याकाळी 4.30 वाज सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता भरतपूरला पोहोचेल. येथून ट्रेन रात्री 8.45 वाजता आग्रासाठी सुटेल आणि सकाळी 10.30 वाजता तिथे पोहोचेल. तेथून रात्री 8.45 वाजता ट्रेन दिल्लीसाठी सुटेल आणि रात्री 2.30 वाजता पोहोचेल. सकाळी 7 वाजता नाश्ता केल्यानंतर, प्रवासी ट्रेनमधून चेकआउट करतील. या संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेन थांबलेल्या जिल्ह्यांतील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट दिली जाईल. राज्यातील जैसलमेर जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

ट्रेनमधील सुविधा-

पॅलेस ऑन व्हील्स ट्रेनमध्ये आलिशान खोल्यांव्यतिरिक्त, स्पा, बार, लॉन्ड्री, जिम आणि सलून सुविधा देखील आहेत. साध्यासह डिलक्स रुम्सही ट्रेनमध्ये आहेत. इंटरनेट, टीव्ही अशा इतर सुविधा आहेत. भारतीय खाद्यपदार्थांसोबतच राजस्थानी, मुघलाई, चायनीज, थाई आणि मेक्सिकन खाद्यपदार्थही प्रवाशांना उपलब्ध करून दिले जातात. (हेही वाचा: मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेसमध्ये आता विस्टा डोम कोचचा नव्याने समावेश)

दर-

ट्रेनमध्ये एका प्रवाशाचे एका रात्रीचे भाडे 55 हजार रुपये आहे. ऑफ सीझनमध्ये ते 43 हजारांच्या जवळपास राहते. या ट्रेनचे कमाल भाडे 1.54 लाख रुपये आहे. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रवास विनामूल्य आहे, तर 5 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी निम्मे भाडे आकारले जाते. निवास आणि भोजन भाड्यात समाविष्ट आहे. याशिवाय स्पा आणि बारसारख्या इतर सुविधांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.