MTDC ने सुरु केली Work From Nature संकल्पना; पर्यटनाचा आनंद घेत करू शकता काम, जाणून घ्या ठिकाणांची नावे व कुठे कराल बुकिंग

चार-पाच दिवसांची सुट्टी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे

Work From Nature (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेले कित्येक महिने कोरोना विषाणूमुळे लोक आपापल्या घरात अडकून होते. आता कुठे पर्यटन स्थळे सुरु झाल्यानंतर लोक बाहेर फिरायला जाण्याची योजना आखत आहेत. लोकांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) पुणे विभागातील सर्व पर्यटक निवासे सुरु असून, कोरोना रोखण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहेत. 27 ते 29 मार्च आणि 2 ते 4 एप्रिल अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनासाठी इच्छूक आहेत. मात्र कोरोनाची परिस्थिती आणि कामाचा ताण यांमुळे पर्यटक सध्या कमी प्रमाणात बाहेत पडत आहेत. पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अभिनव संकल्पना आणली आहे.

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडून नव्याने ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी एमटीडीसीने पर्यटनस्थळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ (Work From Nature) आणि ‘वर्क विथ नेचर’ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करीत आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे.

निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोनची सुविधा दिली आहे. चार-पाच दिवसांची सुट्टी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशिवाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थाप  दीपक हरणे म्हणाले की, ‘एमटीडीसी राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे झाली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवरही ही सुविधा सुरु होईल.’ (हेही वाचा: IRCTC आणि FHRAI पर्यटकांना स्वस्तात हॉटेल बुकींग करण्यासाठी करणार मदत ; पहा ही खास ऑफर)

दरम्यान, एमटीडीसीची सर्वच पर्यटक निवासे ही मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगररांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन आदी गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणूनच आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि रिसॉर्ट बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in  या वेबसाईटवर संपर्क करावा.