Maharashtra To Purchase Land In Kashmir: पर्यटन भवनासाठी महाराष्ट्र काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार; ठरणार असे करणारे पहिले भारतीय राज्य

या दोन भवनांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra To Purchase Land In Kashmir: महाराष्ट्र सरकार जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) या केंद्रशासित प्रदेशात पर्यटन सुविधा उभारण्यासाठी जमीन खरेदी करणार आहे. अशाप्रकारे काश्मीरमध्ये जमीन खरेदी महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य बनणार आहे. अहवालानुसार, प्रस्तावित 'महाराष्ट्र भवन' हे काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये बांधले जाईल, जे खोऱ्यातील पहिले राज्य भवन म्हणून ओळखले जाईल.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, श्रीनगर विमानतळाजवळील इचगाम या शहरात 2.5 एकर जागेत महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने 8.16 कोटी रुपयांना महाराष्ट्राला जमीन हस्तांतरणास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या जूनमध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दौरा केल्यानंतर आणि राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतल्यानंतर भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आला. कलम 370 रद्द करण्यापूर्वी केवळ जम्मू-काश्मीरमधील कायमस्वरूपी रहिवासी या प्रदेशात जमीन खरेदी करू शकत होते. तर बाहेरून आलेल्या उद्योगांना आणि व्यक्तींना 99 वर्षांपर्यंत जमीन भाड्याने देण्याचा अधिकार सरकारला होता.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीनगर आणि अयोध्येत पर्यटक आणि भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी दोन महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा केली. या दोन भवनांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, याआधी मुख्यमंत्री म्हणाले होते, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. (हेही वाचा: Air India Building: एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात; केंद्राने दिली मान्यता, 1,601 कोटी रुपयांना झाला करार)

श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.