उन्हाळ्यात हवी नितळ, मुलायम, निरोगी त्वचा? घरच्या घरी करा हे उपाय
यासाठी स्पेशल स्किन केयर रूटीन फॉलो करण्याची गरज आहे. सोबतच केमिकल उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात
उन्हाचा पारा आता चांगलाच वाढला आहे. मुंबईसारख्या शहरात तर 40 च्या वर तापमान गेले आहे. अशावेळी घरातून बाहेर पडल्यावर धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी सामना करावाच लागतो. या सर्वांमध्ये तुमची त्वचा खराब होण्याची शक्यता अधिक असते. चेहरा निस्तेज होणे, काळवंडणे, सुरकुत्या वाढणे अशा समस्या उद्भवतात. त्यात चेहऱ्याची आद्रता शोषून घेतल्याने चेहऱ्याची मुलायमता कमी होते. यासाठी स्पेशल स्किन केयर रूटीन फॉलो करण्याची गरज आहे. सोबतच केमिकल उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
> दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पिंपल्स येत नाहीत.
> टोमॅटो, मध, लिंबू फेसपॅक उन्हाळ्यात अक्षरशः वरदान आहे. लिंबू ब्लीच आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वासारखे काम करते. टोमॅटोच्या फेसपॅकमुळे सनप्रोटेक्शन तर होतेच, पण त्यातील ल्यूटिन चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते.
> संत्र्यांच्या सालींच्या पावडरीमुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत होते.
> नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात.
> बिटाचा रस प्यायल्यास किंवा चेहऱ्याला लावल्याने शरीराला आवश्यक आयर्न मिळते, लाल रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते. यामुळे त्वचा चमकदार होते.
> त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि उजळपणा प्राप्त करण्यासाठी पपईच्या गराचाही फायदा होतो.
> बाहेरून आल्यास एक छोट्या काकडीचा रस, अर्धा चमचा ग्लिसरीन व एक चमचा गुलाबाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते. (हेही वाचा: Men's Lifestyle : तुम्हालाही हवी आहे Clean आणि Clear त्वचा? सर्वात आधी बदला 'ही' गोष्ट)
> काळपटपणा घालवण्यासाठी एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस आणि थोडे मीठ टाकून आंघोळ केल्याने त्वचा उजळते.
> तेलकट चेहऱ्यासाठी मुलतानी माती, कोरफड, अंड्याचा बलक आणि मध यांचा फेसपॅक उपयोगी ठरतो.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)