लॉन्ग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये नाते मजबूत ठेवण्यास मदत करतील 'या' काही टिप्स !

अन्यथा एकटेपणा, ईर्ष्या, शंका यांसारख्या गोष्टी प्रेमापेक्षा वरचढ होतात.

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप (Photo Credit : Pixabay)

कोणतेही नाते हे विश्वासावर अवलंबून असते. त्यात प्रेमाचे नाते हे जरा अधिकच नाजूक. त्यामुळे हे नाते सुरळीत ठेवण्यासाठी दोन्हीकडून समान भाव असणे, आवश्यक आहे.

आजकालच्या गतीशील जीवनशैलीत कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे अनेक कपल्स दूर राहतात. आणि खरी कसोटी सुरु होते. दूर राहुनही नाते पूर्वी इतकेच ताजेतवाने ठेवण्यासाठी थोडे अधिकच प्रयत्न करावे लागतात. अन्यथा एकटेपणा, ईर्ष्या, शंका यांसारख्या गोष्टी प्रेमापेक्षा वरचढ होतात. अशावेळी लॉन्ग डिस्टंस रिलेशनशीप मेंटन करण्यासाठी नेमके काय करावे? तर त्यासाठी या काही टिप्स....

टेक्नोलॉजीची मदत घ्या

साथीदाराची खूप आठवण येत असल्यास टेक्नोलॉजीची मदत घ्या. व्हिडिओ चॅट हा सर्वात चांगला पर्याय आहे. याशिवाय इतर अनेक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही अगदी लहान सहान गोष्ट देखील पार्टनरसोबत शेअर करु शकता.

रोज संवाद साधा

लॉन्ग डिस्टंस रिलेशनशीप मजबूत ठेवण्यासाठी दोघांमध्ये रोज संवाद होणे गरजेचे आहे. कितीही व्यस्त असलात, दमलेले असलात तरी थोडा वेळ तरी साथीदारासोबत संवाद साधा. व्हाट्सअॅप, फेसबुकवर कितीही बोलत असलात तरी एकमेकांना दिवसातून कमीत कमी एक फोन जरुर करा.

भेटण्याचे प्लॅनिंग

आगामी भेटीचे प्लॅनिंग पूर्वीपासूनच करुन ठेवा. एकमेकांशी बोलताना कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे, ते ठरवा. कोठे जायचे आहे, काय करायचे आहे, हे संमतीने ठरवून घ्या. त्यामुळे दोघेही उत्साही राहाल आणि नात्यातील ओलावा टिकून राहील.

काही लपवू नका

साथीदारापासून गोष्टी लपवणे, हा एक प्रकारचा धोका आणि बेईमानी ठरेल. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होईल. तुम्ही कोणासोबत राहता, काय करता, तुमचे फ्रेंड्स कोण आहेत, याची पूर्ण माहिती साथीदाराला असणे, आवश्यक आहे. कारण या गोष्टी इतर कोणाकडून कळल्यास नात्यात वादळ निर्माण होईल.

खूप वेळ रागावून राहू नका

नात्यात लहान सहान कुरबूरी होतच असतात. पण जर तुम्ही तुमच्या साथीदाराला वेळीच माफ करणं योग्य ठरेल. दूर असताना हे वाद अधिक वाढवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे वेळीच मतभेद दूर करुन सगळं सुरळीत करा. त्यामुळे नात्यातील प्रेम टिकून राहील आणि भेटीवेळी तुम्ही एकमेकांचे हसत स्वागत कराल.



संबंधित बातम्या