Nitin Gadkari On Live-In and Same Sex Marriages: 'लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजासाठी धोकादायक'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
केंद्रीय मंत्री तक्रारीच्या स्वरात म्हणाले की, ‘तुम्ही मौजमजेसाठी मुलांना जन्म दिला आणि त्यांची जबाबदारी झटकत असाल तर हे चालणार नाही.'
Nitin Gadkari On Live-In and Same Sex Marriages: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लिव्ह इन रिलेशनशिप (Live-In Relationships) आणि समलैंगिक विवाह (Same Sex Marriages) समाजासाठी चुकीचे असल्याचे म्हटले आहे. बुधवारी 19 डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या यूट्यूब पॉडकास्ट शोमध्ये केंद्रीय मंत्री गडकरींना विचारण्यात आले की, लिव्ह-इन आणि समलैंगिकता या ट्रेंडचा समाजावर काय परिणाम होईल? त्यावर गडकरी म्हणाले की, लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना चुकीची असून ती समाजाच्या नियमांच्या विरोधात आहे. त्यांच्या मते समलिंगी विवाहामुळे समाजरचनाही नष्ट होईल. यामागचे कारणही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.
नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता-
नितीन गडकरी म्हणाले, 'लग्न केले नाही तर मुले कशी होणार? त्या मुलांचे भविष्य काय असेल? समाजरचना उद्ध्वस्त केली तर त्याचा लोकांवर काय परिणाम होईल?. गडकरींच्या मते, मुले जन्माला घालणे आणि त्यांचे योग्य पालनपोषण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. केंद्रीय मंत्री तक्रारीच्या स्वरात म्हणाले की, ‘तुम्ही मौजमजेसाठी मुलांना जन्म दिला आणि त्यांची जबाबदारी झटकत असाल तर हे चालणार नाही. समाजात काही नियम असतात ते पाळले पाहिजेत.’
युरोपीय देशांतील समस्या-
ते पुढे म्हणाले, ‘एकदा मी लंडनमधील ब्रिटीश संसदेत गेलो होतो. यावेळी मी ब्रिटनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना त्यांच्या देशासमोरील सर्वात मोठ्या समस्यांबद्दल विचारले होते. तेव्हा मला समजले की युरोपीय देशांतील सर्वात मोठी समस्या म्हणजे, स्त्री-पुरुष विवाहात रस न घेणे आणि आणि लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देणे हे आहे.’ (हेही वाचा: Same-Sex Marriage: समलिंगी विवाह बंदी असंवैधानिक, जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाचा निर्णय)
लिंग गुणोत्तर-
केंद्रीय मंत्र्यांच्या मते, समाजात लिंग गुणोत्तराचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जर प्रत्येक 1000 पुरुषांमागे 1500 स्त्रिया असतील तर पुरुषांना दोन बायका ठेवण्याची परवानगी द्यावी लागेल. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात दर 1000 पुरुषांमागे 943 महिला आहेत. तर 2021 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 च्या अहवालानुसार, देशात दर 1000 पुरुषांमागे 1020 महिला आहेत.