National Boyfriend Day : मराठी मालिकांमधील 'या' व्यक्तिरेखांमध्ये तरुणींना दिसला स्वप्नातील राजकुमार !
पाहुया कोणते आहेत ते कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा....
प्रत्येक मुलीची बॉयफ्रेंडबद्दल काही खास स्वप्न असतात. तो असा असावा, तो तसा असावा अशा इच्छा तर असतातच. पण त्याचबरोबर तो कसा असू नये याबद्दलचीही मतं डोक्यात स्पष्ट असतात. तरुणींच्या या स्वप्नरंजनात भर घातली ती म्हणजे छोट्या पडद्यावरील या व्यक्तिरेखांनी.
या व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर आल्या आणि तरुणींमध्ये क्रेझ निर्माण झाली ती असा बॉयफ्रेंड असण्याची. पाहुया कोणते आहेत ते कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा....
घनश्याम काळे (स्वप्निल जोशी)
एका लग्नाची दुसरी गोष्टी ही मालिका म्हणजे मालिका विश्वातील एक सोनेरी पानचं.
त्यातील राधा-घनाची जोडी चांगलीच गाजली. या मालिकेमुळे आधी तरुणींच्या मनात असलेल्या स्वप्निलने तरुणींच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली.
श्रीरंग गोखले (शशांक केतकर)
होणार सून ही मी या घरची या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेला 'श्री' म्हणजेच शशांत केतकर तर तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला होता. या मालिकेनंतर श्री सारखा गुड लूकींग, प्रेमळ, केअरिंग आणि समजूतदार बॉयफ्रेंड आपल्यालाही हवा, अशी स्वप्ने अनेक तरुणी रंगवू लागल्या.
आदित्य देसाई (ललित प्रभाकर)
टॉल, हॅंडसम आदित्यने तर अनेकींच्या हृदयाचा ठोका चुकवला होता. जुळून येती रेशमीगाठी या मालिकेतून ललित प्रभाकर आदित्य म्हणून समोर आला आणि तरुणींमध्ये त्याची क्रेझ निर्माण झाली. आदित्यचा शांत, हसरा, समजूतदार स्वभाव आणि भारावून टाकणारं व्यक्तिमत्त्वं यामुळे तरुणींना बॉयफ्रेंड असावा तर असा असं वाटू लागलं.
वैभव लिमये (वैभव तत्त्ववादी)
तुझं माझं जमेना या मालिकेत वैभवने बायको आणि आईच्या कचाट्यात सापडलेला व्यक्ती अशी भूमिका साकारली होती. तरी देखील आई आणि बायकोची बाजू समजावून घेत दोघींवरच्या प्रेमात समोतल राखणारा व्यक्ती साकारला. हॅंडसम वैभवचा हा समजूतदारपणा तरुणींना भावला नसेल तर नवलंच.
ओम चौधरी ( उमेश कामत)
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो उमेश कामतने एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ओम चौधरी ही व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या अवखळ, अल्लड गर्लफ्रेंडला समजून घेणारा बॉयफ्रेंड त्याने उत्तमरित्या साकारला. मुलांमधील ही मॅच्युरिटी मुलींना अगदी मनापासून आवडते.