Bumble Study: भारतातील 81 टक्के महिलांना 'अविवाहित राहणे' वाटते जास्त सुखकारक; देशातील विवाहासंस्थेबद्दल समोर आला धक्कादायक अहवाल
लग्नाच्या बंधनात अडकण्यापेक्षा एकटे राहण्यात जास्त सुखकारक असल्याचे सर्वेक्षणातील 81 टक्के महिला म्हणत आहेत.
भारतामध्ये अजूनही ‘लग्न’ (Marriage) हा जीवनाचा अविभाज्य घटक समजला जातो. मुलीने शिक्षण पूर्ण केले किंवा मुलाला नोकरी मिळाली, की लगेच कुटुंबीय त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावतात. ‘लग्न करून सेटल होणे’, ही जणू काही आयुष्य जगण्याची एक मोठी गरज असल्याचा अविर्भाव घरच्यांच्या विचारांमध्ये दिसतो. मात्र आता भारतात लग्न आणि रिलेशनशिपबाबत केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. अभ्यासानुसार, भारतातील 81 टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना अविवाहित किंवा एकटे राहणे अधिक सुखकारक वाटत्ते.
हा अभ्यास विवाह आणि नातेसंबंधातील वेगवेगळ्या प्रश्नांवर करण्यात आला. हे सर्वेक्षण बंबल (Bumble) या डेटिंग अॅपने केले आहे. डेटिंग अॅप बंबलच्या अलीकडील अभ्यासानुसार, 5 पैकी 2 (39%) डेटिंग करणाऱ्या भारतीयांचा असा विश्वास आहे की, लग्नाच्या सिझनवेळी त्यांचे कुटुंबीय त्यांना पारंपारिक मॅचमेकिंग करण्यासाठी विचारतात. लग्नाच्या हंगामात आपल्या मुलांचीही पारंपारिक पद्धतीने लग्ने व्हावीत असे त्यांना वाटते.
सर्वेक्षणादरम्यान, लोकांना ‘लग्न केव्हा करायचे आहे?’ असे विचारले असता, 39 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना लग्नासाठी दबाव टाकला जातो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अविवाहित भारतीयांपैकी जवळजवळ एक तृतीयांश (33%) असे म्हणतात की, भारतातील लग्नाच्या सिझनवेळी त्यांना एक वचनबद्ध, दीर्घकालीन नातेसंबंधात प्रवेश करण्यास भाग पाडले जाते. ते म्हणतात, ‘दीर्घकाळ टिकणारे वैवाहिक नातेसंबंध जोडण्याची’ त्यांना सक्ती वाटते. (हेही वाचा: भारतामध्ये विवाहबाह्य डेटिंग अॅपच्या वापरात वाढ; Gleeden वर झाले 20 लाख युजर्स)
बंबलच्या अभ्यासानुसार, भारतातील 81 टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना अविवाहित आणि सिंगल राहणे अधिक आरामदायक वाटते. लग्नाच्या बंधनात अडकण्यापेक्षा एकटे राहण्यात जास्त सुखकारक असल्याचे सर्वेक्षणातील 81 टक्के महिला म्हणत आहेत. परंतु यातील 63 टक्के लोक असेही म्हणतात की, ते त्यांच्या आवडी आणि गरजांपुढे झुकणार नाहीत. सर्वेक्षणानुसार, 83 टक्के स्त्रिया म्हणतात की त्यांना योग्य पुरुष मिळेपर्यंत त्या लग्न करण्याची वाट पाहतील.