Ramadan 2019: आज दिसेल रमजानचा चाँद, उद्यापासून सुरु होतील रोजे; जाणून घ्या या महिन्याचे महत्व
इस्लाममधील हा सर्वात पवित्र महिना असून, मुस्लिम बांधवांसाठी फार मोठा सण आहे. या सणाची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली असून, आज जर का चाँद दिसला तर तरावीहची विशेष नमाजही सुरु होईल
देवाची इबादत करण्याचा रमजान (Ramadan) चा महिना सुरु होत आहे. इस्लाममधील हा सर्वात पवित्र महिना असून, मुस्लिम बांधवांसाठी फार मोठा सण आहे. या सणाची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली असून, आज जर का चाँद दिसला तर तरावीहची विशेष नमाजही सुरु होईल. उद्यापासून मुस्लीम बांधवांचे उपवास म्हणजेच रोजे सुरु होतील. मात्र जर आज चाँद दिसला नाही तर तरावीहची नमाज उद्या होऊन, मंगळावारपासून रोजे सुरु होतील. या महिन्यात अल्लाहच्या केलेल्या प्रार्थनेचे फळ हे दुपटीने मिळते असे म्हणतात, म्हणून प्रार्थना, रोजे, नमाज अशा धार्मिक वातावरणात हा महिना व्यतीत करावा.
रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पिता अल्लाहची इबादत म्हणून रोज उपवास केला जातो. चाँद दिसल्यानंतर संध्याकाळी इफ्तार केले जातो. खजूर, सुकामेवा, शेवया, दूध यांबरोबरच चिकन, अंडी यांसारखे पदार्थ या काळात प्रामुख्याने खाल्ले जातात. रमजानच्या महिन्यामध्ये जकात देणे, कुरान वाचणे, नमाज पढणे अशी कामे करून अल्लाहला प्रसन्न केले जाते. या महिन्यात जास्तीत जास्त सत्कृत्य करावे असे सांगितले आहे.
या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. म्हणून मुस्लिम बांधवांसाठी या महिन्याचे महत्व आणि पावित्र्य फार मोठे आहे. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले, तेव्हा पासून म्हणजेच इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली.
रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केले जातात. इस्लाममध्ये रमजान महिन्यात खोटे बोलणे, वाईट कृत्य करणे, भांडण, गुन्हा अशा गोष्टींपासून दूर राहण्याची सूचना दिली आहे. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा महिना म्हणून याकडे पहिले गेले आहे.