World Malaria Day 2020: जागतिक मलेरिया दिन इतिहास, महत्त्व आणि वर्तमान
मात्र, वास्तव असे की, जगभरात प्रत्येक 2 मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे.
World Malaria Day 2020: 'प्रोटोजुअन प्लाज्मोडियम' (Protozoan Plasmodium) नावाच्या कीटाणूच्या मादी एनोफिलीज डासापासून मलेरिया (Malaria) होतो. आजवर या आजाराने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच अवघे जग आज कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थातच COVID-19 या विषाणूचा सामना करत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या विषाणूचे वर्णन साथिचा आजार असे केले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया (Malaria) आणि इतर साथींच्या आजारांचा अनुभव लक्षात घेता जगभरातील देशांनी कोरोनाचे संकट लवकरात लवकर कसे निपटता येईल यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलावीत. महत्त्वाचे असे की आज जागतिक मलेरिया दिन World Malaria Day 2020) आहे. जाणून घ्या मलेरिया दिन इतिहास, महत्त्व आणि वर्तमान.
मलेरिया दिन इतिहास
जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभर साजरा होतो. 2008 मध्ये अफ्रिकेत हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मलेरिया या साथिच्या आजाराने आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे अवघ्या जगाने एकत्र येत मलेरिया आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. 2007 या वर्षाच्या मे महिन्यात भरलेल्या 60 व्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या परिषदेला उपस्थित असलेल्या 44 देशांनी एकमुखाने ही घोषणा केली.
जागतिक मलेरिया दिन 2020 - संकल्पना
यंदाच्या वर्षी मलेरिया दिन 2020 निमित्त "Zero malaria starts with me." अशी थीम घेण्यात आली आहे. मलेरिया संपविण्यासाठी "Zero malaria starts with me." या विचाराला चालना देणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. त्यासाठी WHO ने RBM सोबत एकत्र आली आहे. मलेरिया उच्चाटनासाठी राजकीय, सामाजिक पातळीवर येकत्र येणे. त्यासाठी विशिष्ट अजेंडा तयार करणे असे या संकल्पनेचा हेतू आहे. (हेही वाचा, Coronavirus: स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण तापमान, दमट वातावरणात मरतो कोरोना व्हायरस- व्हाइट हाउस)
महत्त्व
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार सन 2000 आणि 2004 या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. या काळात मृत्यूदर सुमारे 40% घसरला आहे. ही आनंदाची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा 2019 चा अहवाल सांगतो की, सन 2014-2018 या काळात मात्र मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विशेष यश आले नाही. साधारण 2017 मध्ये मलेरियाने जेवढे मृत्यू झाले तेवढेच 2018 मध्येही झाले. त्यामुळे मलेरिया उच्चाटनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
धक्कादायक असे की, मलेरिया आजाराच्या उच्चाटनासाठी 25 एप्रिल या दिवशी भलेही जागतिक मलेरिया दिन साजरा होतो. मात्र, वास्तव असे की, जगभरात प्रत्येक 2 मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. त्यामुळे मलेरिया दिन आणि वर्तमान स्थिती या लढ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.