World Diabetes Day 2020: दिवाळी च्या दिवशीच यंदा जागतिक मधुमेह दिन; blood-sugar levels वर या सणासुदीच्या दिवसात कसं नियंत्रण ठेवाल?
तसे झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. मग दिवाळी सारख्या सणांमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यसाठी काय कराल?
भारतामध्ये यंदा सणांचा राजा दिवाळी (Diwali) आणि जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) हे दोन्ही दिवस योगायोगाने 14 नोव्हेंबर या एकाच दिवशी आले आहेत. भारतामध्ये सण म्हटला की गोडधोड आणि खाद्यसंस्कृतीमधील विविध पदार्थ यांची रेलचेल असते. त्यातही दिवाळी म्हणजे फराळासोबतची अनेक गोडाचे पदार्थ, मिठाया असतात. त्यामुळे अनेकजण डाएट विसरून दिवाळीचे 4 दिवस मज्जा करतात. पण मधुमेहींच्या रूग्णांना यंदा या दिवाळीत थोडी विशेष काळजी घेणं अधिक आवश्यक आहे. सध्या दिवाळीसोबत कोरोनाचं संकटही दबा धरून बसलेलं असताना तुम्हांला रोगप्रतिकार शक्ती या दिवसांत अधिक सक्षम ठेवण्याचं आव्हान आहे. भारतामध्ये अजूनही कोरोनाचं सावट असल्याने यंदा फराळावर ताव मारण्याचा बेत टाळा. मधुमेहींसमोरील मोठं आव्हान असतं ते म्हणजे रक्तातील साखरेमध्ये अचानक मोठे चढ-उतार होऊ न देणं. तसे झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. मग दिवाळी सारख्या सणांमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यसाठी काय कराल? ऋजुता दिवेकरच्या या खास '5'डाएट टीप्सने ठेवा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात !
दिवाळीचा फराळ आणि मधुमेही
- दिवाळीत फराळ घराघरामध्ये केला जातो. चकल्या, चिवडा, करंज्या हे पदार्थ टेम्प्टिंग असले तरीही ते मर्यादीत खावेत. दिवसाची सुरूवात म्हणजे नाश्त्याला ते पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हांला इतर दिवसांप्रमाणेच दिवाळीतही नाश्त्या घेणं भाग आहे. त्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही फराळ मोजका खाऊ शकता.
- दिवाळीत गोड खाण्याची हौस पूर्ण करायचीच असेल तर साखरेला नैसर्गिक पर्याय शोधा. यामध्ये फळं, खजूर, अंजीर, जर्दाळू यांचा समावेश करा.
- दिवाळीच्या दिवसांतही नियमित तुमच्या ब्लड ग्लूकोज लेव्हल पाहत रहा. काही त्रास असल्यास वेळीच औषध-उपचार घ्या. गोळ्यांच्या, जेवणाच्या वेळा टाळू नका.
- घरगुती मिठाई, फराळ यांच्यावर भर द्या. बाजारातील फराळ, गोड पदार्थ टाळा म्हणजे तुम्हांला तेलापासून अगदी गोडापर्यंत सार्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
- शीतपेयांमध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्सपेक्षा हेल्दी पर्यायांचा विचार करा. यामध्ये घरगुती सरबतं, नारळ पाणी पिऊ शकता.
जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. यानिमित्त मधुमेह या अनुवंशिक आजाराबद्दाल समाजात जागृती निर्माण केली जाते. यंदा कोरोनामुळेमधुमेह, रक्तदाब याचा त्रास असणार्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान मधुमेह झाला म्हणजे सारं गोड बंद कसे कडक किंवा मनाविरुद्ध नियम करू नका. तुम्हांला केवळ पोर्शन कंट्रोल करत तुमच्या गोड खाण्याच्या इच्छेवर थोडा काबू ठेवायचा आहे.