झोपण्याची योग्य पद्धत आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम
झोपण्याच्या योग्य पद्धती आणि त्याचे फायदे:
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातील, जीवनातील ताण-तणाव कमी करायचा सर्वोत्तम उपाय म्हणजे झोपणे. तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्रीची झोप ही कमीत-कमी 8 तासाची असली पाहिजे असे सांगितले जाते. ती 8 तासाची झोप आपल्यापैकी बरेच जण घेत ही असतील किंवा नाहीही. मात्र ही झोप कशा पद्धतीची असली पाहिजे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ झोप पूर्ण करण्याच्या मागे न पळता कमी तासाची झोप घेतलात मात्र ती योग्य पद्धतीने घेतलात, तर त्याचे आरोग्यावर होणारे फायदे खूपच लाभदायी आहेत. चला तर मग आज आपण जाणून घेऊया झोपण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे व तोटे:
झोपण्याच्या योग्य पद्धती आणि त्याचे फायदे:
1. पाठीवर झोपणे
पाठीवर झोपणे ही सर्वात योग्य आणि शरीराला फायदेशीर अशी झोपण्याची पद्धत आहे. असं म्हणतात रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले सर्व अवयवही शांत झालेले असतात. अशा वेळी पाठीवर झोपल्याने आपल्या अवयवांवरही कोणताही भर पडत नाही. त्यांची संपूर्ण रात्रभर आपल्या अवयवांची कार्येही अगदी सुरळीतपणे सुरु असतात. तसेच आपल्याला मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखीचा त्रास होत नाही. तसेच तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर ह्या स्थितीत झोपताना गुडघ्याखाली उशी घेऊन झोपल्यास त्रास होणार नाही. पाठीवर झोपण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चेह-यांवर मुरम येत नाही.
2. डाव्या कुशीवर झोपणे
तुम्हाला आठवत का आपल्याला कधी खोकला लागला असेल, बरं वाटतं नसेल तर आपली आई नेहमी सांगते डाव्या कुशीवर झोप म्हणून. पण त्याचे कारण आजतागायत आपल्याला कळले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या ह्रद्य हे डाव्या बाजूला असते. डाव्या कुशीवर झोपल्याने ह्रद्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवत नाही. रक्त प्रवाह सुरळीत होतो. थकवा जाणवत नाही. तसेच आपल्याला घोरण्याची सवय असल्यास त्यापासून मुक्त होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे उत्तम. त्याचबरोबर आपल्याला गॅस, अॅसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत नाही. मात्र डाव्या कुशीवर झोपणे हे जरी फायदेशीर असले तरी अधिककाळ डाव्या कुशीवर झोपणेही शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे ह्रद्यावर ताण पडू शकतो.
3. हातपाय पसरुन झोपणे
हात-पाय पसरून झोपणंही आरोग्यासाठी चांगलं असते. यामुळे आपण स्ट्रेस आणि मसल्स पेन पासून दूर राहतो. या अवस्थेत पलंगावर पाठीच्या भारावर झोपून दोन्ही पाय पसरा.
झोपण्याच्या अयोग्य पद्धती आणि त्याचे दुष्परिणाम:
1. गुडघे दुमडून झोपणे
एका कुशीवर गुडघे दुमडून पोटाजवळ घेऊन झोपणे हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे मानदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच महिलांच्या स्तनांवरही आता विपरित परिणाम होऊ शकतो.
पोटावर दाब देऊन झोपणे:
पोटावर झोपणे ही शरीरासाठी अत्यंत घातक पद्धत आहेत. या स्थितीत आपले मान, पाठीचे हाड योग्य स्थितीत नसते. ज्यामुळे आपल्याला मानदुखी, पाठदुखी आणि परिणामी डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. अशा स्थितीत झोपायचे जरी असल्यास पोटाखाली कमी उंचीची उशी घेऊन झोपा.
शरीराच्या अवयवांना तसेच आपल्या पचेंद्रियांना शांत करण्यासाठी, आराम देण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आवश्यक तेवढी झोप घेणे. मात्र ही झोप योग्य पद्धतीने घेतल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो. मग कसे वाटला आमचा हा लेख जरुर कळवा.
(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय
सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला
घेणे आवश्यक आहे.)