Unilever चा मोठा दावा- 'या' Mouthwash चा 30 सेकंद वापर केल्याने 99.9 टक्के कमी होईल Coronavirus

कंपनीचे म्हणणे आहे की नवीन फॉर्म्युलावर आधारित त्यांचे नवीन माउथवॉश (Mouthwash) वापरल्याच्या 30 सेकंदात 99.9 टक्के कोरोनाव्हायरस मरून जाईल.

Coronavirus | (Photo Credits: PixaBay)

ग्‍लोबल फास्‍ट मूव्हिंग कंज्‍यूमर गुड्स (Global FMCG Major) कंपनी युनिलिव्हरने (Unilever) कोरोना विषाणू (Coronavirus) विरूद्ध युद्धात मोठा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन फॉर्म्युलावर आधारित त्यांचे नवीन माउथवॉश (Mouthwash) वापरल्याच्या 30 सेकंदात 99.9 टक्के कोरोनाव्हायरस मरून जाईल. याचाच अर्थ कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या नवीन माउथवॉशचा उपयोग करुन तुम्ही कोविड-19 पासून सुरक्षित राहू शकता. पुढील महिन्यात कंपनी आपले नवीन माऊथवॉश बाजारात आणत आहे. मात्र, कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की हे फॉर्म्युलेशन कोविड-19 वर ठोस उपचार नाही किंवा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या उपायही ठरू शकत नाही.

युनिलिव्हरने सांगितले आहे की, अमेरिकेत युनिलिव्हर रिसर्च लॅबने मायक्रोबॅक लॅबोरेटरीजच्या प्रारंभिक लॅब टेस्टमध्ये सीपीसी टेक्नॉलॉजी (CPC Technology) असलेल्या माऊथवॉश फॉर्म्युलेशनमुळे, 30 सेकंदात SARS-CoV-2 मध्ये 99.9 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना विषाणू हा तोंडातील लाळेद्वारे, शिंकण्याद्वारे पसरतो. यानंतर, काही प्रकरणांमध्ये गंभीर लक्षणे दिसतात तर काही वेळा लक्षणेही दिसत नाहीत. परंतु ती व्यक्ती संक्रमित झाली आहे की नाही, ते फक्त कोरोना टेस्टद्वारेच समजू शकते.

कंपनीने म्हटले आहे की, जर तोंडात विषाणूची संख्या कमी असेल तर त्याचा प्रसार देखील कमी होईल. आतापर्यंतच्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर तसेच माउथवॉशमुळेही कोरोना विषाणूचा प्रसार रोखता येतो. युनिलिव्हरचे ओरल केअर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख जी. रॉबर्ट्सने हे स्पष्ट केले की, 'हा माउथवॉश ना कोविड-19 चा उपचार आहे, नाही हा प्रसार रोखण्यास मदत करतो. मात्र, आतापर्यंतच्या चाचण्यांच्या निकालांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आमचा नवीन माउथवॉश तोंडात असलेल्या कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'जागतिक महामारीच्या सध्याच्या टप्प्यावर कंपनीला नव्या फॉर्म्युल्यावर आधारीत माऊथवॉशच्या परीक्षेचा निकाल जगासमोर शेअर करणे महत्त्वाचे वाटले, म्हणूनच आम्ही या क्षणी फक्त चाचण्यांचे निकाल जाहीर करत आहोत. हे माउथवॉश पुढील महिन्यात भारतामध्ये लॉन्‍च केले जाणार आहे.