Tomato Flu: केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू'चा कहर; 5 वर्षांखालील मुले पडत आहेत आजारी; जाणून घ्या लक्षणे
हा विषाणूजन्य ताप, चिकनगुनिया किंवा डेंग्यूचा दुष्परिणाम तर नाही ना याची तपासणी होत आहे. केरळच्या शेजारील राज्यांमधून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कोईम्बतूरमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत
कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. अजूनही देशात रोज नवीन रुग्ण समोर येत आहेत. अशात एका नव्या आजाराने दहशत माजवली आहे. अन्न विषबाधाच्या अलीकडील घटनांमध्ये, केरळच्या अनेक भागांमध्ये टोमॅटो फ्लू (Tomato Flu) नावाचा एक नवीन विषाणू आढळून आला आहे. यानंतर तापाची तक्रार असलेल्या रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या दुर्मिळ आजाराने आतापर्यंत राज्यातील 5 वर्षांखालील 80 हून अधिक मुलांना ग्रासले आहे आणि आगामी काळात ही संख्या वाढू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
काय आहे हा आजार-
टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. फ्लूची लागण झालेल्या मुलाला पुरळ आणि फोड येऊ शकतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणूनच याला 'टोमॅटो फ्लू' किंवा 'टोमॅटो फिव्हर' म्हणतात. हा रोग फक्त केरळच्या काही भागात आढळला आहे आणि आरोग्य अधिकार्यांनी चेतावणी दिली आहे की संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास व्हायरस आणखी पसरू शकतो.
लक्षणे-
टोमॅटो फ्लूच्या मुख्य लक्षणांमध्ये शरीरावर लाल पुरळ, फोड, त्वचेची जळजळ आणि डिहायड्रेशन यांचा समावेश आहे. याशिवाय अति ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे व नाक वाहणे, हाताचा रंग बदलणे ही लक्षणे संसर्ग झालेल्या मुलांमध्ये दिसून आली आहेत.
टोमॅटो फ्लूचा सामना कसा करावा?
जर एखाद्या मुलास टोमॅटो फ्लूची लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासह, संसर्ग झालेला मुलगा पुरळ आणि फोड खांजवणार नाही याची काळजी घ्या. यासोबतच स्वच्छता राखावी. वेळोवेळी द्रवपदार्थांचे सेवन करावी व भरपूर विश्रांती घ्यावी. (हेही वाचा: Covid-19: हवेत सापडलेले कोरोना व्हायरसचे कण पसरवू शकतात संसर्ग; अभ्यासात खुलासा)
दरम्यान, टोमॅटो फ्लूबाबत डॉक्टरांमध्ये अजूनही संभ्रम आहे. हा विषाणूजन्य ताप, चिकनगुनिया किंवा डेंग्यूचा दुष्परिणाम तर नाही ना याची तपासणी होत आहे. केरळच्या शेजारील राज्यांमधून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कोईम्बतूरमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. केरळमध्ये येणाऱ्यांची तामिळनाडू-केरळ सीमेवरील वालार येथे चाचणी केली जात आहे. राज्यभर तपास आणि उपचारासाठी 24 सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये जाऊन पाच वर्षांखालील मुलांची तपासणी केली जाणार आहे.