Marburg Virus Outbreak: कोरोनानंतर आता मारबर्ग व्हायरसचा उद्रेक, अनेक लोकांचा मृत्यू; WHO अलर्ट मोडवर, जाणून घ्या लक्षणे

मारबर्गवर उपचार करण्यासाठी कोणतीही अधिकृत लस किंवा औषधे नाहीत, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी रीहायड्रेशन उपचारांमुळे (Rehydration Treatment) तुमची जगण्याची शक्यता सुधारू शकते.

Virus (Photo Credit: IANS)

अजूनही जग कोरोनाच्या संकटातून आणि त्या धक्क्यातून सावरले नाही, अशात आणखी एका नवीन विषाणूने चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुष्टी केली आहे की, आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा उद्रेक (Marburg Disease Outbreak) झाला असून, या व्हायरसचा प्रसार वाढू लागला आहे. या धोकादायक विषाणूमुळे गिनीमध्ये आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडले आहेत. मारबर्ग विषाणूमुळे झालेल्या मृत्यूनंतर डब्ल्यूएचओ सुद्धा अलर्ट मोडमध्ये आला आहे आणि त्यावर विचारमंथन करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की ताप, अतिसार, थकवा आणि उलट्या यासह विविध लक्षणांमुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 16 जणांना याचा त्रास होत आहे. इबोलाप्रमाणेच मारबर्ग विषाणूचाही उगम वटवाघळांपासून झाला आहे. हा विषाणू संक्रमित लोकांपासून आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी वापरून पसरतो.

हा विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक धोकादायक आणि प्राणघातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 1967 मध्ये जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्टमध्ये तसेच बेलग्रेड (सर्बिया) येथे एकाच वेळी झालेल्या या दोन मोठ्या उद्रेकांमुळे या प्रकारच्या रोगाची प्राथमिक ओळख झाली.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, युगांडामधून आयात केलेल्या आफ्रिकन हिरव्या माकडांवर प्रयोगशाळेतील प्रयोगानंतर हा उद्रेक उघडकीस आला. त्यानंतर, अंगोला, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा येथे या विषाणूची काही प्रकरणे नोंदवली गेली. डब्ल्यूएचओने संसर्ग प्रतिबंध, केस मॅनेजमेंट, प्रयोगशाळा, आरोग्य आणीबाणी यासाठी तज्ञ तैनात केले आहेत. गेल्या आठवड्यात, इक्वेटोरियल गिनीने 200 हून अधिक लोकांना वेगळे ठेवले आहे.

मारबर्ग विषाणू रोग हा एक अत्यंत विषाणूजन्य रोग आहे ज्यामुळे रक्तस्रावी ताप येतो. या विषाणूचा मृत्यू दर 88% पर्यंत असतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने अहवाल दिला आहे की मारबर्ग विषाणूची लक्षणे 2 ते 21 दिवसांच्या दरम्यान अचानक सुरू होतात. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. या लक्षणांच्या काही दिवसांनंतर, छातीवर, पाठीवर आणि पोटावर पुरळ उठतात. याशिवाय उलट्या, छातीत दुखणे, घसादुखी, पोटदुखी आणि जुलाब ही या विषाणूची लक्षणे असू शकतात. (हेही वाचा: COVID-19 रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत; फुफ्फुसांत संसर्ग होण्याचा धोका टळणार)

मारबर्गवर उपचार करण्यासाठी कोणतीही अधिकृत लस किंवा औषधे नाहीत, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी रीहायड्रेशन उपचारांमुळे (Rehydration Treatment) तुमची जगण्याची शक्यता सुधारू शकते.