International Tea Day 2018 : चहाप्रेमींनो ! तलफ आली तरीही चहा या '5' वेळी पिणं टाळा

चहा आरोग्यदायी असला तरीही चूकीच्या वेळेस किंवा ठिकाणी प्यायल्यास तो आरोग्याला नुकसानकारक ठरतो .

चहा (Photo Credits- Pixabay)

International Tea Day 2018: चहाशिवाय अनेकांचा दिवसच अपूर्ण असतो.  मग चहाप्रेमींनो आजचा दिवस तुमचा आहे. जगभरात 15 डिसेंबर हा दिवस International Tea Day  म्हणून साजरा केला जातो. ठराविक वेळ झाली की काही लोकांना चहा (Tea)  मिळाला नाही तर अस्वस्थ वाटते. चहा एक उत्तेजक पेय असले तरीही त्याचं नियमित कसं आणि कोणत्या वेळात सेवन करताय? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच काही लोकांना चहा पिणं त्रासदायक वाटत तर काहींना चहा आरोग्यदायी वाटतो. आजकाल बाजारात मसाला चहा (Masala Chai) , ग्रीन टी (Green Tea), व्हाईट टी (White Tea)  असे एक ना अनेक प्रकार उपलब्ध आहेत. कमी -जास्त प्रमाणात प्रत्येकाचेच काही फायदे -तोटे असतात.

चहा आवडतो म्हणून किंवा व्यसन असल्यासारखा कधीही कुठेही चहा पिणं आरोग्यादायी नाही. 'अति तिथे माती' हा नियम चहालादेखील लागू होतो. मग तुम्ही चहाचे कितीही दिवाने असलात तरीही किमान 'या' काही वेळेस चहा पिण्यापूर्वी विचार करा. कारण चहाप्रेमींच्या या सवयी त्यांच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात.

1. बेड टी - 

अनेकांना बेड टी पिण्याची सवय असते. पण ही सवय फारशी आरोग्यदायी नाही. काहीही न खाता, पिता थेट उठल्या उठल्या चहा पिणं आरोग्याला त्रासदायक आहे. यामुळे तोंडाचं आरोग्य बिघडत मात्र त्याचसोबत पित्ताचा त्रास होऊ शकतो. चहा आरोग्याला फायदेशीर असला तरीही सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.

2. जेवणासोबत किंवा नंतर चहा पिणे –

चहा आणि जेवण या दोन्ही गोष्टींच्या सेवनामध्ये काही ठराविक तासांचं अंतर असणं गरजेचे आहे. चहामधील घटक जेवणातील अनेक पोषकद्रव्यांचा नाश करू शकतात. प्रामुख्याने चहा आणि जेवण एकत्र केल्याने आहारातील आयर्न घटक कमी होतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते.

3. रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे –

अनेकांना रात्री झोपण्यापुर्वी चहा, कॉफी पिऊन झोपण्याची सवय असते. रात्रीची शांत झोप आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. चहामधील कॅफिन घटक झोपेचं प्रमाण कमी करतात. यामुळे एकातून एक अनेक आजारांचा गुंता वाढू शकतो.

4. सप्लिमेंट्स आणि चहा -

तुम्ही आरोग्यासाठी कॅल्शियम किंवा आयर्न सप्लिमेंट्स गोळ्या घेत असल्यास त्यानंतर लगेजच चहा पिणे टाळणं अधिक फायदेशीर आहे. तुमच्या ब्रेकफास्टमध्येही आयर्नयुक्त काही पदार्थ असल्यास त्यावर चहा पिऊ नका. आरोग्याला ते फारसे चांगले नाही.

5. अस्वच्छ ठिकाणी चहा पिणं -

चहा पिण्याची तलफ आल्यास काहीजण रस्त्यावर टपरीवर कोठेही चहा पितात. मात्र माशा किंवा खूप कीटकांचा वावर असलेल्या, अस्वच्छ पाण्यात, भांड्यात चहा बनवत असल्यास किंवा टपरीच्या आजुबाजूचा भाग अस्वच्छ असल्यास तेथे चहा पिणं टाळा. यामुळे इंफेक्शनचा धोका अधिक असतो.

योग्य प्रमाणात चहा पिणं अगदीच आरोग्यदायी आहे. काहीजण कोरा चहा पसंत करतात, काही जण चहा दूधासोबत मिसळून पितात तर काही लोकांना आजकाल ग्रीन टी पिण्याची सवय आहे. चहा हा एक प्रकारचा काढा आहे परंतू त्याच अतिसेवन आरोग्याला त्रासदायक आहे. हे लक्षात ठेवा आणि आजचा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करा.