कवटी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी; ४ वर्षांच्या चिमुकलीला जीवदान

मात्र, डॉक्टरांनी मोठ्या परिश्रमपूर्वक आणि आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे चिमुकलीला जीवदान मिळाले.

अल्झायमर आणि डाएट ( Photo Credits: Pxhere

विविध क्षेत्रात नेहमीच आग्रेसर असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुण्यात चिमुकलीवर कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कवटी प्रत्यारोपणासंदर्भात भारतभरात झालेल्या एकूण शस्त्रक्रियांपैकी यशस्वी झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. एका चार वर्षांच्या चिमुलकलीची कवटी निकामी झाली होती. त्यामुळे चिमुकलीचा जीव धोक्यात होता. मात्र, डॉक्टरांनी मोठ्या परिश्रमपूर्वक आणि आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे चिमुकलीला जीवदान मिळाले.

शस्त्रक्रिया झालेल्या पीडित चिमुकलीला एका चारचाकी वाहनाची धडक बसली होती. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिच्या डोक्यातन प्रचंड रस्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या मेंदुच्या आजुबाजूला असलेल्या कवटीचा सुमारे ६० टक्के भाग हा निकामीच झाला होता. कवटीतील उर्वरीत हाडांनाही मार बसल्याने जखमा झाल्या होत्या. त्यामुळे तिचे प्राण वाचू शकतील किंवा नाही याबाबत डॉक्टरही साशंक होते.

दरम्यान, समोर आलेल्या कोणत्याही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायचे अशी शपथ घेतलेल्या डॉक्टरांनी चिमुकलीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हे प्राण वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. पण, या शस्त्रक्रियेदरम्याणच तिच्या जीवालाही धोका होता. तो धोका डॉक्टरांनी पत्करला. तिच्यावर उपचार सुरु केले. मात्र, शस्त्रक्रिया करताना तिच्या मेंदूला जराही धक्का लागणार नाही. याची काळजी डॉक्टरांनी घेतली. या कामी त्यांनी आजवरच्या प्रॅक्टीसमधून आलेले सर्व कैशल्य पणाला लावले.

दरम्यान, कवटीची हाडं बाजूला केल्यावर त्या ठिकाणी नवी हाडांचे प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. त्यासाठी त्या ठिकाणी नवी कवटी बसवावी लागणार होती. त्यासाठी अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया पार पाडल्यावर ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली. हे सगळे वैद्यकीय प्रोग पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड वर्षांचा काळ गेला खरा. पण, या प्रयोगामुळे चिमुकलीला जीवदान मिळाले याचा आनंद डॉक्टरांसह तिच्या कुटूंबीयांनी व्यक्त केला.