Covid 19 चा संसर्ग टाळण्यासाठी वापरलेले मास्क Disinfect कसे कराल? जाणून घ्या मास्क स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
तितकीच त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. मास्क वापरुन झाल्यावर तो स्वच्छ आणि Disinfect कसा करायचा? जाणून घेऊया या संबंधित योग्य माहिती...
Tips To Disinfect Mask: कोरोना व्हायरस संकटाचा सामना संपूर्ण जग करत आहे. यावर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोनाचा संसर्ग रोखणे हे मोठे आव्हान जगभरातील अनेक देशांसमोर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मार्ग अनेक देशांनी अवलंबला आहे. तसंच मास्क, हँड सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होऊ लागल्या आहे. ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यासाठी आपल्याला त्याबद्दलची योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र त्याचा योग्य वापरासंबंधी माहिती अनेकांना नाही. (Coronavirus Outbreak: मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे जितके महत्त्वाचे आहे. तितकीच त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. मास्क वापरुन झाल्यावर तो स्वच्छ आणि Disinfect कसा करायचा? जाणून घेऊया या संबंधित योग्य माहिती...
घरी मास्क स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स:
कोरोना व्हायरस विरुद्ध एन-95 मास्क आतापर्यंत सर्वात प्रभावी मानला जात होता. हॉस्पिटल कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एन-95 मास्क वापरण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला होता. जर तुम्ही कोविड 19 पासून बचाव करण्यासाठी एन-95 मास्क वापरत असाल तर त्याची नियमित स्वच्छता करणे आणि त्याचा फ्लिटर बदलणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही घरी तयार केलेला किंवा बाजारातून विकत घेतलेला मास्क वापरत असाल तर तो स्वच्छ करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर तुम्ही करु शकता...
पहिली पद्धत:
मास्कचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मास्क साबण आणि गरम पाण्याने धुवावा. धुतल्यानंतर 5 तास उन्हात सुकवावा.
दुसरी पद्धत:
मास्क धुतल्यानंतर जर सुकवण्यासाठी ऊन नसेल तर प्रेशर कुकरचा वापर करता येईल. यासाठी प्रेशर कुकरमध्ये पाण्यात मीठ घालून 15 मिनिटांसाठी मास्क उकळवावा. त्यानंतर सुकवावा.
तिसरी पद्धत:
मास्क वापरल्यानंतर स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करावा आणि सुकवण्यासाठी ईस्त्रीचा वापर करावा.
चौथी पद्धत:
जर तुम्ही डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर तो उकळवू नका किंवा साफही करु नका. कारण त्यातील पार्टिकल्स धुतल्यानंतर खराब होण्याची शक्यता असते.
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी मास्कचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारकडून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाजारात विविध पद्धतीचे मास्क उपलब्ध आहेत. तर घरच्या घरी मास्क बनवण्याच्या सोप्या पद्धतींचा भडिमारही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मास्क अवश्य वापरा मात्र त्याची योग्य ती स्वच्छता जरुर करा.