Cure For Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी; जगात प्रथमच सेल थेरपी उपचारानंतर डायबिटीज रुग्ण झाला बरा, चिनी शास्त्रज्ञांची कमाल
रुग्ण आता 33 महिन्यांपासून इन्सुलिनपासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. या अभ्यासामुळे मधुमेहावरील सेल थेरपीच्या क्षेत्रात महत्त्वाची प्रगती होईल, असे संशोधकांच्या चमूचे म्हणणे आहे.
Cure For Diabetes: आजकाल मधुमेह (Diabetes) हा आजार झपाट्याने वाढत आहे. अस्वास्थ्यकर आहार आणि उत्तम जीवनशैलीचा अभाव यामुळे अनेकांना मधुमेहाशी सामना करावा लागतो. अशात मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चिनी शास्त्रज्ञांनी एक मोठी प्रगती करत, थेरपीचा वापर करून रुग्णाचा मधुमेह यशस्वीरित्या बरा केला आहे. अशाप्रकारे चीनी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या गटाने मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण आणला आहे. शांघाय चांगझेंग हॉस्पिटल, चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत सेंटर फॉर एक्सलन्स इन मॉलिक्युलर सेल सायन्स आणि शांघायमधील रेन्जी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि संशोधकांच्या पथकाने हे यश मिळवले आहे.
हे संशोधन जर्नल सेल डिस्कव्हरीमध्ये 30 एप्रिल रोजी प्रकाशित झाले. जो रुग्ण बारा झाला आहे त्याचे वय 59 वर्षे आहे. तो 25 वर्षांपासून टाइप 2 मधुमेहाने त्रस्त होता. मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी टाइप 2 सर्वात सामान्य आहे. अंदाजे 90 टक्के रुग्णांवर परिणाम होतो. हा मुख्यत्वे आहाराशी संबंधित आहे आणि कालांतराने विकसित होतो.
अहवालानुसार, 2017 मध्ये या रुग्णाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते, परंतु त्याच्या बहुतेक स्वादुपिंडांनी काम करणे थांबवले होते. स्वादुपिंडाचे कार्य रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करणे आहे. यामुळे रुग्णाला दररोज इन्सुलिनच्या अनेक इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागत होते. जुलै 2021 मध्ये रुग्णाचे सेल प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या अकरा आठवड्यांनंतर त्याला बाह्य इन्सुलिनची गरज भासली नाही. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी, तोंडी औषधांचा डोस हळूहळू कमी केला गेला आणि एक वर्षानंतर तो पूर्णपणे बंद केला गेला. (हेही वाचा: Life Expectancy Dropped By 2 Years: कोविड-19 मुळे लोकांचे सरासरी वय जवळपास 2 वर्षांनी कमी झाले; WHO च्या अहवालात धक्कादायक खुलासा)
सेल प्रत्यारोपणानंतर रुग्णाकडून जेव्हा पाठपुरावा करण्यात आला, तेव्हा असे आढळून आले की, रुग्णाच्या स्वादुपिंडाच्या आयलेटचे कार्य प्रभावीपणे पुनर्संचयित केले गेले आहे. रुग्ण आता 33 महिन्यांपासून इन्सुलिनपासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. या अभ्यासामुळे मधुमेहावरील सेल थेरपीच्या क्षेत्रात महत्त्वाची प्रगती होईल, असे संशोधकांच्या चमूचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या मते, चीनमधील 140 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्यापैकी 40 दशलक्ष आजीवन इंसुलिन इंजेक्शनवर अवलंबून आहेत. या नवीन सेल थेरपीमुळे हा आजार बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.