COVID-19 Vaccine Update: सीरम इंस्टीट्यूट उत्पादीत Covovax लसीच्या लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स जुलैपासून सुरु
पुण्यातील सीरम इंस्टीट्युटने नोव्होव्हॅक्सच्या प्रोटीन बेस्ड व्हॅक्सिन कोव्होव्हॅक्सचे उत्पादन सुरु केले असून या लसीच्या लहान मुलांवरील चाचण्या जुलै महिन्यापासून सुरु करणार असल्याचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले.
पुण्यातील (Pune) सीरम इंस्टीट्युटने (Serum Institute) नोव्होव्हॅक्सच्या (Novavax) प्रोटीन बेस्ड व्हॅक्सिन कोव्होव्हॅक्सचे (Covovax) उत्पादन सुरु केले असून या लसीच्या लहान मुलांवरील चाचण्या जुलै महिन्यापासून सुरु करणार असल्याचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले. या लसीचा पहिला साठा या आठवड्यात सीरम इंस्टीट्यूटमध्ये उत्पादीत केला जाणारा आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. (Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेकची Covaxin लस 18 वर्षाखालील मुलांना मिळणार? Clinical Trials साठी तज्ञांची शिफारस)
अलिकडेच झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्समध्ये कोव्होव्हॅक्स कोविड-19 विरुद्ध 90 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायल्समध्येही लसीचे दोन्ही डोस 100 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले.
18 वर्षांखालील मुलांचे संरक्षण करण्यासाठी ही लस सक्षम असून याच्या ट्रायल्स सुरु आहेत, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.कोव्होव्हॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचाण्या एकूण 920 मुलांवर केल्या जातील. 12-17 आणि 2-11 या वयोगटातील प्रत्येकी 460 मुलांचा सहभाग असेल, असे काही मीडिया रिपोर्ट्मधून समोर आले आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये नोव्होव्हॅक्स आणि सीरम इंस्टीट्यूट मध्ये करार झाला होता. याअंतर्गत गरीब आणि मध्यम उत्पादन असलेल्या देशांना लस पुरवठा करण्यासाठी अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने SII ला लायसन्स दिले होते. त्यानंतर मार्च 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात कोव्होव्हॅस लस लॉन्च होईल, असे पुनावाला यांनी म्हटले होते.
नोव्होव्हॅक्सचा ट्रायल्स मधील परिणाम चांगला असून याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातील, असे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत लसीच्या अधिकृत मान्यतेसाठी कंपनीकडून अर्ज करण्यात येणार आहे. यापूर्वी केमिस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग अँड कंट्रोल रिक्वायरमेंटच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच कंपनी आपला अर्ज दाखल करु शकणार आहे.
लसीला मान्यता मिळाल्यानंतर तिसऱ्या तिमाहीत दर महिना 10 कोटी आणि चौथ्या तिमाहीत दर महिना 15 कोटी डोसेस उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे.
याशिवाय हैद्राबाद स्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि BBV154 दोन लसींच्या ट्रायल्स देखील लहान मुलांवर करण्यात येणार आहेत. BBV154 ही सिंगल डोस नेझल व्हॅसिन आहे. त्याचबरोबर Zydus च्या ZyCov-D कोविड-19 लसीच्या ट्रायल्स 12-18 वर्षांवरील मुलांवर करण्यात येणार आहेत.